स्वामी विवेकानंदांचा संदेश .....

स्वामी विवेकानंद हे एक बहुआयामी आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व होते. ते बुद्धिमान होते. त्यांचे भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते आणि ते उत्कट अंत:करणाचे होते. या सर्वात भर म्हणजे त्यांना एक साक्षेपी गुरू लाभलेले होते, ज्यांच्या सान्निध्यात त्यांना सत्याचा साक्षात्कार झाला होता. त्यामुळे त्यांच्या शब्दांना सामर्थ्य प्राप्त झाले होते आणि त्यांच्यात अंतरंग दृष्टी विकसित झाली होती.
स्वामी विवेकानंदांनी पूर्ण भारतभर भ्रमण केलेले होते आणि भारताच्या बाहेरही त्यांनी बऱ्याच देशांतून भ्रमंती केलेली होती. त्यामुळे त्यांना जगाचे दर्शन अगदी जवळून घेण्याची संधी प्राप्त झाली होती. माणसांच्या कमतरता आणि शक्तिस्थाने, विविध संस्कृती तसेच मानवाच्या जीवनावर प्रभाव गाजविण्याची त्यांची शक्ती यांचेही दर्शन त्यांना घडलेले होते. या संबंधात शतकभरात जगभर झालेले विचारमंथन स्वामी विवेकानंद यांनी समजून घेतले होते.
स्वामी विवेकानंदांनी अनेक प्रकारच्या श्रोत्यांपुढे भाषणे केलेली होती. अतिशय गरीब आणि अतिशय श्रीमंत, अशिक्षित आणि सुशिक्षित, तंत्रकुशल आणि तंत्रज्ञान वंचित, जेते असल्याचा गर्व बाळगणारे उन्मत्त राज्यकर्ते आणि त्यांच्या जुलुमी राजवटीखाली दबले जाणारे गुलाम, आस्तिक आणि नास्तिक अशा सर्व प्रकारच्या श्रोत्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेले होते. त्यांनी संबोधित केलेल्या श्रोत्यांमध्ये हे विश्व म्हणजे एका सत्याचाच विस्तार आहे असे मानणारे लोकही होते आणि त्याच्या विपरीत जगाला सश्रद्ध आणि अश्रद्ध अशा दोनच गटात वाटणारे कट्टर धर्मपंथी सुद्धा होते. सर्वांच्या कल्याणासाठी परमेश्वराची प्रार्थना करणारे लोकही त्यांच्या श्रोत्यांत होते आणि आमची देवाची व्याख्या मान्य करतील त्यांचेच फक्त कल्याण होईल असे मानणारे अभिनिवेशी लोकही होते. त्यांना अशा प्रकारे विविध प्रकारच्या श्रोत्यांपुढे भाषणे करावी लागली. त्यांचे भाषण हे त्यांच्या वक्तृत्वाचे प्रदर्शन घडविण्यासाठी होत नसे, तर त्यांचे भाषण म्हणजे त्यांच्या उत्कट अंत:करणाचा सहज आविष्कार असे. त्यांनी लोकांना आध्यात्मिकदृष्ट्या आहे त्या स्तरावरून वरच्या स्तरावर नेण्यासाठीच सातत्याने भाषणे केली.
प्रत्येक माणसाच्या अंत:करणामध्ये दैवी अंश आहे, या उपनिषदांतील सिद्धांतावर स्वामी विवेकानंदांची श्रद्धा होती आणि त्या ईश्वरी अंशाला जागे करणे तसेच जगामध्ये होणाऱ्या ईश्वरी आविष्काराचा आदर करणे कसे आवश्यक आहे, हाच त्यांचा भाषणांचा हेतू असे परंतु आपल्यासमोर बसलेले श्रोते कोणत्या वर्गातले आहेत, याचा विचार करून ते आपल्या याच एका तत्त्वाच्या निरनिराळ्या आयामांवर भर देत असत. असे त्यांच्या वक्तृत्वाचे विश्व व्यापक होते. त्यांच्या श्रोत्यांमध्ये भौगोलिकदृष्ट्या आणि वैचारिकदृष्ट्या परस्परविरोधी लोकांचाही समावेश असे. त्यामुळे त्यांनी केलेल्या व्याख्यानांमध्ये अनेकवेळा परस्परविरोधी विचारांचाही समावेश झालेला दिसून येतो. त्यांच्या विचारातली ही विसंगती आणि विरोधाभास खटकतो, परंतु या विरोधाभासाचा विचार आपल्याला त्यांच्यासमोर बसलेल्या श्रोत्यांचा संदर्भ घेऊन करावा लागेल. तरच या वरवर दिसणाऱ्या विरोधाभासामागचे कारण आपल्या लक्षात येईल. उदाहरणार्थ...
स्वामी विवेकानंदांनी आपल्या एका पत्रात हिंदूंविषयी म्हटले आहे, ""हिंदूंविषयी आता खूप बोलून झाले... आता फारच झाले... हिंदूंच्या त्या भूमीत म्हणजे भारतात जाण्यासाठी मी अमेरिकेचा निरोप का घ्यावा? अंधश्रद्ध, निर्बुद्ध, रूढीप्रिय, दुष्ट, निर्दयी अशा प्रथा पाळणाऱ्या या देशात मी का जावे?'' हिंदूंविषयी आणि हिंदुस्थानाविषयी अशाप्रकारचे उपहासात्मक उद्‌गार काढणारे स्वामीजी दुसऱ्या एका व्याख्यानात म्हणतात, ""माझ्या देशबांधवांनो, मी या अमेरिकेत एक वर्षभर राहिलेलो आहे. मी या देशाचा कानाकोपरा आणि हा समाज यांचे जवळून दर्शन घेतलेले आहे आणि त्यानंतर मी त्यांच्यात आणि आपल्यात एक तुलना करून अशा निष्कर्षाप्रत आलो आहे की, ते सांगतात त्याप्रमाणे आपण तेवढे दुष्ट नाहीत आणि ते स्वत:ला समजतात तेवढे देवदूत सुद्धा नाहीत. मला हे सांगितले पाहिजे की, अमेरिका आणि भारत यांची तुलनाच करायची झाली आणि ती प्रामाणिकपणे केली तर असे लक्षात येईल की, नीतिमत्तेच्या बाबतीत आम्हीच श्रेष्ठ आहोत आणि त्या बाबतीत मान ताठ करून चालण्याचा आम्हालाच अधिकार आहे.'' असे सांगून स्वामी विवेकानंद आपण हिंदू आहोत याचा आपणाला अभिमान आहे! असा उच्चरवाने घोष करतात.
शिकागो येथे झालेल्या सर्वधर्मपरिषदेत बोलताना स्वामी विवेकानंद असे म्हणाले होते की, ""एखाद्या धर्माचे प्रचारक, त्यांच्या धर्माच्या प्रसाराने आणि अन्य सर्व धर्माच्या विध्वंसाने धार्मिक ऐक्य प्रस्थापित होईल अशा भ्रमात असतील तर मी त्यांना सांगू इच्छितो की, बंधूंनो, तुमचे हे स्वप्न म्हणजे एक अशक्य ठरणारी आशा आहे. कोणत्याही एका धर्माच्या विजयाने जगात धार्मिक सौहार्द्र नांदू शकणार नाही.'' असा संदेश देणारे स्वामी विवेकानंद भारतात परत आल्यानंतर असे म्हणाले होते की, ""आपल्याला केवळ आपल्या देशाचे पुनरुज्जीवन करून भागणार नाही. केवळ आपल्या देशाचाच असा विचार करणे ही एक छोटी गोष्ट आहे. मी नव्या कल्पना मांडणारा माणूस आहे आणि माझी एक मोठी कल्पना अशी आहे की, हिंदूधर्मीयांनी सगळे जग जिंकलेले आहे.''
स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते, ""शूर लोकच जगाचा उपभोग घेऊ शकतात. तुमचे शौर्य दाखवून द्या, त्याचा कालानुरूप आविष्कार घडवा, तुमच्या शत्रूत फूट पाडा, भेद निर्माण करा, वेळ पडल्यास लाच द्या, त्यांच्यात बंडखोरीची पेरणी करा आणि तुमच्या शत्रूविरुद्ध उघड युद्ध पुकारा, त्याला जिंका आणि जगाचा आनंद लुटा. तरच तुम्ही खरे धार्मिक राहाल, अन्यथा इतरांनी तुम्हाला लाथाडले, सतत अपमानित केले आणि तरी तुम्ही ते अपमान गिळून अध:पतित जीवन जगत राहाल, तर तुमचे आयुष्य म्हणजे एक नरकवास ठरेल! नंतर तर तुम्हाला नरकात जावे लागेलच, हेच शास्त्राने सांगितले आहे.''
विजयासाठी वाट्टेल ते करण्याचा संदेश देणारे स्वामी विवेकानंद दुसऱ्या ठिकाणी म्हणतात, ""माझ्या आयुष्यात मी एक मोठा धडा शिकलो आहे की, आपण जे साध्य करतो, ते साध्य तर पवित्र असले पाहिजेच, परंतु त्यासाठी वापरलले साधनसुद्धा शुद्ध असले पाहिजे. किंबहुना मी तर असे म्हणेन की, आपण जे साध्य करतो त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा ते कोणत्या मार्गाने साध्य करतो, यावर जास्त लक्ष देणे हेच यशाचे रहस्य आहे.''
स्वामी विवेकानंद ख्रिश्चन धर्मावर टीकाही करतात आणि दुसऱ्या बाजूला येशू ख्रिस्तांविषयी अतिशय आदरानेही बोलतात. ख्रिस्ताने ग्रीस आणि रोम यांचा विध्वंस केला, असेही स्वामीजी दाखवून देतात. येशू ख्रिस्त आणि ख्रिश्र्चन धर्म यांच्याविषयी स्वामीजींनी जे काही म्हटले आहे, त्याचा संदर्भ सोडून विचार केला तर त्या म्हणण्यात विरोधाभास आहे असे दिसेल. त्यांनी ही विधाने कधी केली आहेत आणि कशाच्या संदर्भात केली आहेत, हे तर पाहणे गरजेचे आहेच, पण ते कोणासमोर बोलत होते, त्या श्रोत्यांची वैचारिक, आध्यात्मिक पातळी कोणती होती आणि त्यांनी ती विधाने कोणत्या परिस्थितीत केली आहेत? हेही पाहणे गरजेचे आहे.
असा विचार केला नाही तर ही विधाने परस्परविरोधी असल्याचे तर दिसतेच, पण त्यामुळे आपण संभ्रमातही पडतो. हा संभ्रम संपवण्यासाठी आपल्याला स्वामीजींच्या विचारांचा सखोल अभ्यास करावा लागेल. सत्य हे बहुआयामी असते, हे विसरून चालणार नाही. शास्त्रज्ञांनीही हे मान्य केले आहे. उदाहरणार्थ प्रकाश हा कणांचा बनलेला आहे की तरंगांचा बनलेला आहे, असा प्रश्न आपण एखाद्या वैज्ञानिकाला विचारला तर तो उत्तर देईल, दोन्हींनीही बनलेला आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, आपण असत्याकडून सत्याकडे जात नसतो तर सत्याकडून सत्याकडे जात असतो. सामान्य माणसाची प्रगती होत असते तेव्हा तो मर्यादित सत्याकडून उच्च दर्जाच्या सत्याकडे प्रवास करीत असतो.
स्वामीजींचे विचार एवढे सामर्थ्यवान आहेत की, त्यांनी साऱ्या भारत देशाला चेतना दिली आणि या चेतनेने स्वातंत्र्य लढ्याला चालना दिली. तेव्हापासून भारतात घडलेल्या प्रत्येक चांगल्या कामामागे स्वामीजींच्या विचारांची प्रेरणा होती, अजूनही आहे. असे का घडले? स्वामीजींचे हे विचार समजून घेण्यासाठी आणि स्वामीजींना पूर्णपणे समजून घेण्यासाठी त्यांच्या विचारांचा सखोल अभ्यास केला पाहिजे, नित्य अभ्यास केला पाहिजे. केवळ त्यांची उद्धरणे समोर ठेवून आणि त्यांचे संदर्भाशिवाय विश्र्लेषण करून वरवरचा विचार करणे पुरेसे नाही.
भारतीयांची स्वामीजींवर एवढी श्रध्दा आहे की, स्वामी विवेकानंदांचा संदेश म्हणून जे काही सांगितले जाते, त्याचा ते स्वीकार करतात. त्यामुळे माणसाच्या उन्नतीसाठी पाश्चात्त्य देशात जे सांगावे लागते, ते भारतीयांना सांगून चालत नाही. आपण भारतीयांना भलते-सलते काही संागायला लागलो तर ती स्वामीजींशी प्रतारणा तर ठरेलच, पण एका रोगासाठीचे औषध दुसऱ्या रोगासाठी दिल्यासारखे ते घातकही ठरेल. आपले दुर्दैव असे आहे की, या देशातले काही लोक तसा प्रयत्न जाणीवपूर्वक करायला लागले आहेत. हिंदू समाजाची लढावू वृत्ती मारली जावी, या हेतूने हा खोडसाळपणा सुरू आहे.
स्वामींनी पाश्चात्त्य श्रोत्यांसमोर बोलताना, त्यांनी जगभर आपला धर्म पसरविण्याची स्वप्ने पाहू नयेत, असे त्यांना बजावतात पण तेच स्वामीजी हिंदूंसमोर बोलताना मात्र हिंदूंनी आपल्या "आध्यात्मिक' शक्तीच्या जोरावर जगाला जिंकले पाहिजे, असे आवाहन त्यांना करतात. ख्रिश्र्चॅनिटी आणि इस्लाम यांची भूमिका फार वेगळी आहे. आम्ही जो देव मानतो तोच इतरांनी मानला पाहिजे, सर्वजण तो मानत नासतील तर त्यांना त्यासाठी छळ-कपट, हिंसा किंवा धाकाने बाध्य करणे हे आमचे कर्तव्यच आहे, असे ते मानतात, पण हिंदूंची मान्यता तशी नाही. जगाचा पसारा हा एकाच शक्तीचा विस्तार आहे. त्यामुळे त्याच्या विविध रूपांचा आणि निरनिराळ्या आविष्कारांचा आपण आदर केला पाहिजे, असे हिंदू मानतात.
हिंदूंच्या या विचारांचा साक्षात्कार झालेली एक संवेदनशील व्यक्ती म्हणून स्वामीजींना सर्व मानवांविषयी अतोनात प्रेम वाटते. त्यामुळेच ते वरवर विरोधाभास असलेली अशी विधाने करीत असतात. त्यांना एक बाब प्रकर्षाने लक्षात येते की, सर्वसमावेशक धार्मिक विचार हा सकारात्मक झाला पाहिजे, तरच हट्टाग्रही धार्मिक विचार मर्यादेत राहतील. तसे न झाल्यास एकांगी आणि अभिनिवेश पूर्ण धार्मिक विचार मानवतेचा नाश करतील. सर्वसमावेशक विचार आग्रही राहिले नाहीत तर मानवतेचे अस्तित्व आणि प्रगती यांच्यात बाधा येईल. मानवी जात धराशायी होईल. एकांगी धार्मिक विचार सीमित राहिले नाहीत तर ते इतरांनाही संपवतात आणि कालांतराने स्वतःही संपून जातात. त्यामुळे स्वामी विवेकानंद जगद्‌गुरूंच्या भूमिकेतून एकांगी विचारांना सर्वसमावेशक करण्याची पद्धत सांगतात, त्यांना जीवनातल्या वस्तुस्थितीची जाणीव देतात. सर्व समावेशकतेचा आत्मविश्र्वास वाढवतात. त्यांना आग्रही बनवून जगभर प्रभावी करण्याचा मार्ग दाखवतात.
दुर्दैवाने भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच्या धार्मिक विचारांच्या प्रसाराने स्वामी विवेकानंद यांच्या या भावनेशी पूर्णपणे विसंगत रूप धारण केले आहे. सर्वसमावेशक विचारांच्या हिंदूंना एकांगी विचारातून निर्माण होणाऱ्या हिंसक कारवायांबद्दल दोषी धरले जात आहे. एकांगी विचारांच्या धर्मांचा फाजील लाड केला जात आहे. त्यांनाच मान दिला जात आहे. विद्वान, बुद्धिवादी, पंडित, राजकीय नेते आणि मान्यवर लोक हाच मार्ग अवलंबत आहेत.
याचे एक उदाहरण देता येईल. ओरिसाच्या कंधामल जिल्ह्यात स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांच्या निर्घृण हत्येनंतर उसळलेल्या दंगलीवर शशी थरूर यांनी एक लेख लिहिला आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, "धर्मांतराला असा विरोध करणे आणि त्यावर अशी प्रतिक्रिया व्यक्त करणे हे "इंडियन मुजाहेदीन' ने केलेल्या बॉम्बस्फोटासारखेच आहे.' म्हणजे स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांनी वनवासींचे धर्मांतर रोखले जावे म्हणून केलेले त्यांच्या कल्याणाचे कार्य हे एक अतिरेकी कृत्य आहे, असे थरूर यांना म्हणायचे आहे.
त्यांचे हे मत पटण्यासारखे नव्हतेच, त्यामुळे अनेकांनी त्यांचा निषेध केला, तेव्हा त्यांनी दुसरा लेख लिहिला. त्यात त्यांनी स्वामी विवेकानंदांचेच उदाहरण वापरले. ""सर्व धर्मांच्या उपासना पद्धती निरनिराळ्या असल्या तरी शेवटी ईश्र्वर हा एकच आहे, असे विवेकानंद म्हणतात, मग एक वनवासी हिंदूंप्रमाणे मूर्तीची पूजा करण्याऐवजी ख्रिश्र्चन होऊन आकाशातल्या बापाकडे हात पसरायला लागला तर काळजी वाटण्याचे कारण काय?''
शशी थरूर यांचे हे म्हणणे सकृत्‌दर्शनी बरोबर वाटते आणि ते हिंदूंना चांगले माहीतही आहे. हिंदूंना हे फार पूर्वीपासूनच माहीत आहे. ते त्यांनी आपल्या जीवनात उतरवलेसुद्धा आहे. त्यासाठी शशी थरूर यांनी स्वामी विवेकानंदांना उद्‌घृत करण्याचीही गरज नाही, पण थरूर यांना विवेकानंदांचा हा विचार सांगायची हौसच असेल तर त्यांनी तो पाश्र्चात्त्य देशातल्या ख्रिश्र्चन मिशनऱ्यांना सांगावा, ते तसा सांगतील?
शशी थरूर यांच्यासारखे हिंदू समाजात जन्मलेले आणि हिंदू समाजाच्याच अंगाखांद्यावर खेळून, बागडून मोठे झालेले लोकच स्वामी विवेकानंदांनी काढलेले उद्‌गार असे नको तिथे वापरत असतात. स्वामीजींचा असा विचार चुकीच्या लोकांना सांगण्याची ही कृती अज्ञानाने किंवा अनवधानाने झालेली नाही तर ती जाणीवपूर्वक केलेली आहे. सर्वसमावेशक धर्मविचार क्षीण व्हावा म्हणून एकांगी विचारांच्या धर्मासाठी असलेला हा विचार सर्वसमावेशक हिंदूधर्मीयांना हेतुपुरस्सरपणे सांगितला जात आहे. तसा तो सांगितल्याने हिंदूंनाच अपराध्यासारखे वाटायला लागते. आपल्या धर्मातल्या लोकांनी अन्य धर्मात जाऊ नये यासाठी प्रयत्न करणे हासुद्धा अपराध आहे, गुन्हा आहे, असे त्यांना वाटायला लागते.
या सगळ्यांचा परिणाम काय? असहाय्य समाज, दुबळे नेतृत्व आणि 26 नोव्हेंबरसारखे दहशतवादी हल्ले। असे हल्ले पुन्हा होऊ नयेत असे वाटत असेल तर स्वामी विवेकानंद जयंतीच्या औचित्यावर आपण आध्यात्मिक शक्तीच्या आधारे जग जिंकण्याचा निर्धार केला पाहिजे. सर्वसमावेशक धर्मविचार आग्रही झाला पाहिजे. विध्वंस नको, एकत्रीकरण हवे. मतभेद नकोत, मनोमिलन हवे. दहशतवादाशी सामना करण्यासाठी स्वामी विवेकानंदांचाच विचार हवा !''

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

विसरू नको रे आई बापाला

मराठा आणि ब्राह्मण वाद.....