स्वामी विवेकानंदांचे विचार ..

स्वामी विवेकानंदांना अवघे ३९ वर्षांचे आयुष्य लाभले. पण ‘नर करनी करे, तो नर का नारायण हो जाये|’ म्हणजे काय हे त्यांनी दाखवून दिले. नरेंद्रांचे विवेकानंद झाले ते निव्वळ त्यांच्या विचारधारेवर. जगातल्या प्रत्येक घटनेवर त्यांचे विचारधन हे सामान्यांना विचार करायला लावणारे आहे. अंधश्रद्धेबद्दल बोलताना ते म्हणायचे, श्रद्धेला डोळे नसतात. ती आंधळी असते. फार तर श्रद्धेचा एक मार्ग आहे आणि ज्ञानाचा एक मार्ग आहे. परंतु श्रद्धेचे अंधश्रद्धा व डोळस श्रद्धा असे दोन प्रकार करण्यात काहीच अर्थ नाही. दुखावणे योग्य नाही. ज्याला स्वतःला प्रगती करून घेण्याचा मार्ग सापडत नाही तो श्रध्देचा मार्ग स्वीकारतो. तो मार्गच बंद केला तर त्याची प्रगती न होता अधोगतीच होईल.
रोज सायंकाळी स्वामी गंगेच्या काठावर बसून विचार करीत असत. काशीमधले साधूसंत, संन्याशी स्वतःत मग्न आहेत. भारतातल्या तरुण पिढीला प्राचीन व समृद्ध वारशाचे भान नाही. ही आंग्लाळलेली पिढीसुद्धा स्वतःत मग्न आहे. या सर्वांचा मेळ घालण्यासाठी परस्पर संपर्क व समाजातल्या सर्व थरांतील लोकांपर्यंत संवाद साधणारी एखादी यंत्रणा उभी रहायला हवी, धर्मशास्त्र व वेदांत याबरोबरच इतिहासाचासुद्धा अभ्यास करायला हवा असे त्यांचे आग्रही मत होते.
संपूर्ण हिंदुस्थान समजून घेण्यासाठी त्यांनी भारतभर भटकंती केली. दोन - तीन वर्षांच्या अथक भटकंतीत त्यांनी हिंदुस्थानातल्या विविध प्रांतांचे जवळून दर्शन घेतले होते. धर्माबद्दलची उदासिनता, जातींमधला द्वेष, दारिद्य्र, साथीचे रोग, दुष्काळ, महापूर यांचे थैमान माजले होते. लोकांची गरिबी नष्ट व्हावी, कारण उपाशी पोटी धर्म समजत नसतो, असे त्यांचे विचार होते. आपल्या आपणच ते हिंदूंची संहिष्णूता, अन्य मतांबद्दल आदर दाखवून देत. भगवद्गीतेचा दाखला देत ते विश्‍वबंधुत्वाच्या भावनेला साद घालत.
कोणत्याही झाडाची परीक्षा त्याच्या सडलेल्या फळांवरून करायची नसते, तर चांगल्या रसरसीत व पक्व फळावरून करायची असते. ते फळ पाहताच त्या झाडात सुधारण्याची आंतरिक शक्ती आहे की नाही हे लक्षात येते. भारताने जगाला वैदिक, गणित, ज्योतिष, संगीत, महाकाव्य, व्याकरण व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे धर्म व अध्यात्म दिले. ही सर्व प्रगती येशू व बुद्धाच्याही पूर्वी झाली हे लक्षात ठेवा, असा विचार ते मांडत. कारण एकामेकांच्या धर्मांचा दुस्वास त्यांना मान्य नव्हता.
स्वामींचे विचार काही लोकांना पटत नसत. ते मग त्यांच्याविरूद्ध गरळ ओकत असत. मद्रासमधल्या एका सभेत त्यांना उद्देशून स्वामी म्हणाले होते, हे सुधारक लोक धर्म व संस्कृतीवर टीका करण्यातच धन्यता मानतात. त्यांचा मार्ग मोडतोडीचा आहे. माझा मार्ग जोडाजोडीचा आहे. आंतरिक व नैसर्गिक विकासावरच मी भर देतो. खरे तर या कार्यात सुधारकांहून मी अधिक सुधारक आहे. जगात कोणता समाज असा आहे की, ज्याच्यात दोष नाहीत? तरुणांना माझे असे सांगणे आहे की, भारतभूमी हाच देव माना. त्या भूमीच्या लेकरांचा उद्धार होईल, असा प्रयत्न करा. बाकीचे सर्व देव बाजूला ठेवलेत तरी चालेल. अज्ञान व दारिद्य्राने हा देश पोखरला आहे. माणूस निर्माण होईल असा धर्म व विचार आपल्याला हवा आहे.
तरुण व तरुणाईं यांच्याबद्दलचे स्वामीजींचे विचार येणार्‍या कैक पिढ्यांना प्रेरणादायी ठरतील. व्यायामाने शरीर बळकट करा. समर्थ झालात तर जगात काहीही करू शकाल. खेळामुळे शरीर सामर्थ्य व एकाग्रता हे दोन्ही साधता येते. कोणत्याही अभ्यासात वा साधनेत एकाग्रता ही हवीच. शरीराने दुर्बळ असणारा मनानेसुद्धा दुर्बल असतो किंवा तसे होण्याची शक्यता अधिक असते. दुनियेतील सर्व पंथ एकाच अखंड व चिरंतर अशा धर्माची भिन्न रुपे आहेत, असे मानून सर्वांमध्ये आपुलकीचा भाव निर्माण करण्याचे आवाहन ते तरुणांना करत.
एका शिष्याने एकदा स्वामीजींना विचारले की, तुमच्यानंतर दुसरा विवेकानंद होईल का? त्यावर स्वामीजींनी त्याला जे उत्तर दिले त्या उत्तरातील विचारावरच एक ग्रंथ लिहून होईल. स्वामीजी त्याला म्हणाले, प्रत्येकजण विवेकानंद होऊ शकतो. भगवानप्राप्तीसाठी बारा वर्षे जो अखंड ब्रह्मचर्य पालन करील त्या कुणालाही स्वामी होता येईल. ब्रह्मचार्य पालनाने माझ्या बुद्धीवरील आवरण दूर झाले आहे. त्यामुळेच तत्त्वज्ञानासारख्या विषयांवर व्याख्यान देताना मला विचार करीत बसावे लागत नाही. भक्ती तुमच्या अंतरंगात सदैव विद्यमान असते. तिच्यावर कामकांचनाचे एक आवरण पडलेले असते. इतकेच, ते आवरण दूर करायला शिका. ज्ञान, भक्ती, योग आणि कर्म या चार मार्गांनी मुक्तीलाभ होतो. यापैकी जो ज्याचा स्वाभाविक मार्ग असेल त्याच मार्गाने त्याने जायला हवे.
पाप-पुण्याबद्दलचे स्वामीजींचे विचार येथे मुद्दाम नमूद करावेसे वाटतात. विवेकानंद म्हणतात, सर्व स्थळी सर्व काळी, वाईट किंवा पाप म्हणून संबोधता येईल असे कोणतेच कार्य किंवा अशी कोणतीही वस्तू अर्थातच दाखवता येणार नाही. परंतु स्थलकालपरत्वे प्रत्येक गोष्ट किंवा कार्य वाईट वा पापाचे म्हणून सिद्ध करता येईल. म्हणूनच ज्या योगे दुसर्‍या कुणालाही कोणत्याही प्रकारचे कष्ट होतील किंवा जेणेकरून शारीरिक, मानसिक अथवा आध्यात्मिक कोणत्याही प्रकारची दुर्बलता येईल असे काहीही करू नये. असल्या प्रकारचे कृत्य म्हणजे पाप आणि याच्या उलट जे काही ते पुण्य.
स्वामीजींच्या विचाराचे गाठोडे नेहमी भरून असायचे. आपले विचार पाठवण्यासाठी त्याच त्या दृष्टांतांचा उपयोग करण्याची त्यांची पद्धत नव्हती. दरवेळेला अगदी नवीन रीतीने नवीन दाखले देऊन त्यात प्रश्‍नांची उत्तरे देण्याची त्यांची विलक्षण हातोटी होती की, दर खेपेला त्यांचे विचार अगदी नवीनच वाटत. विचार करून सगळे मुद्दे अगदी ठीकठाक जमवून लिहून काढून व्याख्यान देणे त्यांना जमत नसे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर मनावर ताबा ठेवा असे ते नेहमीच म्हणत. ते म्हणत कोणत्याही उपायांनी का होईना प्रथम मन आपल्या काबूत आणण्याचा प्रयत्न करा. म्हणजे बाकी सारे आपोआपच साधेल आणि लक्षात असू द्या की अद्वैतज्ञान प्राप्त होणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. पण त्याचबरोबर हेही लक्षात ठेवा की, मनुष्यजीवनाचे तेच मुख्य उद्दिष्ट वा ध्येय आहे. परंतु ते प्राप्त करून घेण्यासाठी बर्‍याच पूर्व तयारीची वा अतिशय कठोर प्रयत्नांची आवश्यकता असते. साधुसंग व खरेखरे तीव्र वैराग्य यांच्यावाचून त्यांची अनुभूती होणे शक्यच नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

विसरू नको रे आई बापाला

मराठा आणि ब्राह्मण वाद.....