संस्कार

संस्कार म्हणजे नक्की काय? बहुतेकांच्या मते घरी संध्याकाळी शुभंकरोती म्हणणे, मोठयांचा आदर करणे, खरे बोलणे, स्वच्छतेचे पालन करणे...यादी नक्कीच लांबत जाईल. पण हे संस्कार मुलांमध्ये रूजणार कसे? संस्कार ही काही दैवी देणगी किंवा रेडिमेड पॅकेज म्हणून उपलब्ध होणारी गोष्ट नाही. संस्कार हे एका पिढीतून दुस-या पिढीत रूजवायचे असतात. संस्कारांचा अनमोल ठेवा मागच्या शतकात साने गुरूजी यांनी 'श्यामची आई' रूपाने लिहून ठेवला आहे. नाशिकला जेलमधे असतांना साने गुरूजींनी आपल्या आईच्या आठवणी ५ दिवसात लिहून काढल्या. रूढ अर्थाने हे लिखाण काही आत्मचरित्र, कांदबरी किंवा निबंध नाही. त्या आहेत सच्च्या दिलाने लिहीलेल्या आईच्या आठवणीं आणि अंतकरणापासून आईला वाहिलेली श्रघ्दाजंली. 'श्यामची आई' पुस्तकावर कितीतरी पिढया संस्कारक्षम झाल्या. १९५३ साली प्र.के.अत्र्यांनी ह्या पुस्तकावर चित्रपट काढायचा ठरवला. चित्रपटाचा नायक श्याम होता माधव वझे आणि आईच्या भूमिकेत त्यावेळच्या उच्च शिक्षित शिक्षिका संध्या पवार अर्थातच वनमाला. चित्रपट जरी १५३ मिनिटांचा असला तरी एकदा पाहिलेल्या ह्या चित्रपटाचा 'इम्पॅक्ट' (परिणाम) मात्र आयुष्यभर राहतो......

अंघोळ झाल्यावर श्याम आईला पाय पुसायला सांगतो. त्यावेळी आई म्हणते ''श्याम जसे पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसेच मनाला घाण लागू नये म्हणूनही जपत जा. मनाची शुध्दी करण्याकरिता देवाने अश्रूंचे दोन हौद भरून दिले आहे''. भजनाची आवड असलेला श्याम जेव्हा बुवांना चिडविण्यासाठी मोठयाने भजन म्हणतो तेव्हा आई त्याला म्हणते, ''देवाची भक्ती ही मोठयाने नाही तर ह्दयातून केली तर देवा पर्यंत पोहोचते.'' बंधू प्रेमाचे धडे 'चिंधीच्या' गाण्यातून समजावून सांगणारी आई, पोहायला जात नाही म्हणून श्यामच्या पाठीवर चाबकाचे फटके ओढणारी आई, श्यामला कळया न तोडू देणारी आई, महार असलेल्या म्हातारीला मोळी उचलून मानवतेचे धडे देणारी आई, गरीबीतही ताठ मानेने जगणारी आई, आपल्या मुलांनी शिकून मोठे व्हावे म्हणून कष्ट करणारी श्यामची आई.....अशी अनंत रूपे साने गुरूजींनी ४५ भागात लिहून काढली आहेत. तितक्याच प्रभावीपणे आचार्य अत्र्यांनी पडद्यावर उभी केली आहेत. चित्रपटाने १९५३ सालचे राष्ट्रपती सुवर्ण पदक पटकावले. राष्ट्रीय पुरस्कार १९५४ साली सुरू झाले त्यामुळे त्या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कारही 'श्यामची आई'ला मिळाला.

माधव वझेंचा 'श्याम' आणि वनमाला बाईंची 'आई' ह्या अजरामर झालेल्या भूमिका. इतर भूमिकेत बाबुराव पेंढारकर, सुमती गुप्ते, प्रबोधनकार ठाकरे, शंकर कुलकर्णी सारखे कसलेले कलाकार होते. ''वनमाला बाईंना (त्याकाळच्या) आधुनिक कपडयात पाहिले आणि आईची भूमिका ह्या बाई कशा पार करणार?'' अशी आठवण श्याम म्हणजेच 'माधव वझे' सांगतात. वनमाला बाईंचे अस्सल खानदानी सौंदर्य, तपकिरी घारे डोळे आणि चेह-यावरची सोशिकता आईची भूमिका अजरामर करून गेली. नुकताच त्यांचा स्वर्गवास झाला त्यावेळी पुन्हा एकदा रसिकांच्या मनात 'श्यामच्या आईच्या' आठवणी जाग्या झाल्या. वनमाला बाईंच्या नावावर खरतर एकूण ४० चित्रपट जमा आहेत. पण त्यातली सर्वात यादगार भूमिका 'श्यामची आई' आणि नंतर अनुक्रमे 'वसंतसेना' आणि 'सिकंदर' मधली 'रूखसाना'. त्याकाळी वनमाला बाईंनी पॉलिटिकल सायन्स घेऊन एम.ए. केले होते. त्याकाळी कॉलेजला जाणा-या त्या एकटयाच महिला होत्या. त्यामुळे मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेज मधली मुलं त्यांना गंमतीने 'क्वीन ऑफ बीच' म्हणत असत. वसंत देसाईचे संगीत लाभलेल्या ह्या चित्रपटातले 'छडी लागे छम छम' हे ह्दयनाथ मंगेशकरांचे पर्दापणातले गीत रिमिक्सच्या जमान्यात आजही ठेका धरायला लावते.

काळ बदलला तशी माध्यमेही बदलली आणि अधिक प्रभावी झाली. २००४ रोजी 'श्यामचा आई'ला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून रूद्रा व्हिडीओने ह्या चित्रपटाची व्हिसीडी/डिव्हिडी उपलब्ध करून देऊन मोलाची कामगिरी केली आहे. डिव्हिडीमध्ये तर वनमालाबाईंवर अत्यंत माहितीपूर्ण डॉक्युमेंटरी आहे. वाचनाची आवड कमी झालेल्या ह्या पिढीसाठी व्हिसीडी/डिव्हिडी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. त्याबरोबर श्यामची आईचे इंग्रजीत रूपांतर केले आहे व्ही. रामकृष्णन ह्यांनी. पुण्यात ७४ वर्षाचे पुराणिक आजोबा एक हाती घरोघरी जाऊन 'श्यामची आई' पुस्तकाची विक्री करतात. एखाद्या दिवशी पुस्तके विकली गेली नाही तर संध्याकाळचे जेवण ते घेत नाहीत इतकी त्यांची श्यामच्या आईवर निष्ठा आहे. आजपर्यंत त्यांनी पाच हजार पुस्तकांची विक्री केली आहे. त्यांना गरज आहे कोणीतरी हे काम पुढच्या पिढीने हातात घेण्याची.

श्यामच्या आईला पन्नास वर्षे पूर्ण झाली तरी अजूनही रसिकांच्या मनात चित्रपटाच्या आठवणी आणि आईच्या संस्कारांचा पगडा आहे. श्यामच्या आईचे संस्कार हे अनंत काळासाठी आहे. किंबहूना येणा-या काळात त्याची गरज अधिकाधिक भासणार आहे. त्यावेळी कदाचित मुलांच्या आधी त्यांच्या पालकांनी पुस्तक/सीडी बघणे अधिक गरजेचे होईल. कारण संस्कारक्षम पिढीच पुढची पिढी अधिक चांगली जोपासू शकते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

विसरू नको रे आई बापाला

मराठा आणि ब्राह्मण वाद.....