pपहिले प्रेम कोण


श्रावणातली पहाट.. गारवा अंगाला झोंबतोय, चहाच्या कपावरची वाफ त्या गारव्याशी सलगी करण्‍याचा प्रयत्न करतेय, पावसाच्या सरी मधेच थेंब-थेंबात घसरत तुझी आठवण करुन देत आहेत. आणि या अशा मोहक वातावरणात तु माझ्यापासून कोसो दूर आहेस. 


तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मला आपल्या भेटीची आठवण करुन देतो. तुझ्या डोळ्यांची भाषा मला कधीच उमगली नव्हती आणि यामुढेही मला त्यांचे शब्द कळणार नाहीत, पण तुझ्या मनाचा माझ्या मनाशी सुरु असलेला संवाद आजही सुरु असतोच.

माझे मन एकटेच तिकडे दूर-दूर डोकावत असते. त्याला नेमके कोण हवे असते, ते सांगायची त्याची तयारी नसते, पण त्याचा शोध मात्र अविरतपणे सुरु असतो.

मी त्याला अनेकदा रोखण्‍याचा प्रयत्न केला, परंतु माझी बंधनं झुगारत ते तुला शोधत फिरत असते. तुझी चाहुल जरी लागली तरी ते मला तिकडे तुझ्याकडे खेचते.

त्याला वेळेचे भान नाही, त्याला पावसाची जाण नाही, त्याला गारवाही बोचत नाही, आणि निनावी चालणार्‍या माझ्या मनाला रस्त्यांवरचे खडेही टोचत नाहीत. त्याला फक्त आस असते, ती तुझ्या मनाची.

पावसाचे थेंब दोनही हातांच्या ओंजळीत पकडत माझे मन तुला शोधत असते. हातात जमलेले पाणी त्याला तुझ्या पाणीदार डोळ्यातील थेंब वाटतात. पाऊस संपल्यावर माझे मन मग त्याच पाण्यात रंग मिसळत उगाच कॅनव्हॉसवर तुझा चेहरा रेखाटण्‍याचा प्रयत्न करते.

रंगांनाही आता त्या पाण्याची सवय झालीय, दुसरं पाणी टाकलं की चित्र बिघडतं. पांढर्‍या कॅनव्हॉसवर पाण्याचा रंगही मग काळा वाटू लागतो.

जरी तू दूर असलीस तरी 'माझे मन आता तुझे झाले आहे' माझा प्राण, तुझा प्राण या ओळी आठवतात आणि कितीतरी वेळ मन तेच गाणे गुणगुणते.

माझे मन तुझे झाले. तुझे मन माझे झाले.
माझा प्राण, तुझा प्राण
नाही आता वेगळाले....


आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

काही गोष्टी अशा असतात, की त्या समोराच्याला सांगायच्या असूनही आपण सांगू शकत नाही. मी माझं प्रेम व्यक्त करायला हवं होतं की नाही, हा प्रश्न मला आजही पडतो. तुझं ते येणं, हसणं, माझ्याशी बोलताना घाबरणं, कधीकधी गोंधळणं अजूनही मला सर्व काही आठवतं. तू आल्यावर मला काही सुचायचंच नाही. फक्त तुझ्याकडे बघत राहावं, असं वाटायचं. तू गेल्यावर मैत्रिणीबरोबर मी तुझ्यावर शेरेबाजी करायचे. माझ्या प्रेमाचं गुपित मी मनातच ठेवलं. म्हणतात ना, 'काही नाती असतात अबोलपणे बोलण्याची, मनातल्या मनात जोडून मनातच तोडण्याची...' मला अजूनही तुझी पहिली भेट आणि बाकीच्या आठवणी लक्षात आहेत. त्या कधीच विसरू शकणार नाही. ज्या गोष्टी आपण विसरत नाही, त्यालाच तर आठवणी म्हणतात. नंतर मी स्वत:मध्येच हरवू लागले. नेहमी तुझाच विचार करायचे. तुझ्या वागण्यातून मला एक प्रकारचा संकेत मिळायचा. पण वाटायचं, की हा माझा भास तर नाही ना? दोन प्रेमींसारखं आपण कधी वागलोच नाही. एवढंच काय, आपण एकमेकांशी मैत्रीसुद्धा केली नाही. फक्त कामांपुरतंच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष बोलणं व्हायचं. आपण दोघं एकमेकांच्या समोर असल्यावर एवढं गोंधळायचो, की काय बोलायचं हे सुचायचंच नाही. मी तुला जितकं विसरायचा प्रयत्न करते, तितकाच तू मला आठवत राहतोस. जेव्हा मला खूप मनापासून वाटत असतं, की तू दिसावास तेव्हा प्रत्यक्षात तू दिसत नाहीस. पण माझ्या ध्यानीमनी नसतानाही अचानक तू मला दिसतोस. असं का होतं? तुला पाहिलं, की माझे डोळे लगेच भरून येतात. आनंदाने की दु:खाने, हे माझं मला समजत नाही. जेव्हा मला तुझी गरज होती, तेव्हा तू माझ्यापासून खूप दूर होतास. आजही मला तू हवा आहेस. पण तू माझ्या जवळ नाहीस. कदाचित या वेडीचं नावसुद्धा तुला माहीत नसेल. मला फक्त एकदाच तुला सांगायचं आहे, की मी तुझ्यावर खूप भरपूर, सॉल्लिड... माझ्याकडे शब्दच नाहीत, पण खरंच प्रेम करते.

- तुझीच वेडी,

शारदा

अजून आठवतो तो पहिला दिवस. त्या दिवशी मी तुला प्रथम पाहिलं होतं. कपाळावर थोडे पुढे आलेले मऊ, सरळ केस, शांत नजर, शिडशिडीत बांधा, उमदं व्यक्तिमत्त्व..! आमच्या शेजारी राहणाऱ्या तुझ्या नातेवाईकांकडे तू आला होतास. तासाभराने निघून गेलास. हुरहूर मागे ठेवून... त्या वेळी माझी गत अगदी 'काय बाई सांगू, कसं गं सांगू?' या गाण्यातल्या मुलीसारखी झाली होती. तुझं दुसरं दर्शन मला दिवाळीच्या दिवशी झालं. तू पुन्हा शेजारीच आला होतास. त्या दिवाळीत मी मात्र अचानक आलेल्या पावसात जणू चिंब भिजले होते. त्यानंतर तू परदेशात गेल्याचं समजलं. आनंद झाला खरा! पण तुझं दर्शन दुर्लभ होऊन बसलं. ओळख वगैरे तसंच राहिलं. तुझ्यापर्यंत पोहोचणं अशक्य होतं. पृथ्वी गोल आहे. त्यामुळे परत भेट होईल, या आशेवर होते मी! ...आणि खरंच एक दिवस तू अचानक समोर आलास. तुला पाहून माझ्या हृदयाची धकधक थांबली जणू. मी काय बघते आहे, करते आहे, शोधते आहे, मलाच कळत नव्हतं. तुझ्या नजरेतून माझी ती स्थिती सुटली नसेल. पण काय करू, माझा स्वत:वर ताबाच राहिला नाही. मी विरघळून जातेय, असंच वाटलं मला. हे सगळं माझं एकटीचंच गुपित होतं आजवर. मी कुण्णाकुण्णाला त्याचा पत्ता लागू दिला नाही. आजच मी हे सगळं सांगतेय. अरे, तुझ्या नकळत किती आणि काय काय शेअर केलं मी तुझ्या बरोबर, काय सांगू? देवळातली शांतता, पहाटेचा गार वारा, समुदाकाठचा सूर्यास्त, विजा कडकडताना पडणारा पाऊस, डोंगरमाथा आणि बोटीवरचा डेकसुद्धा! गाढवा (हे प्रेमाने हं!) किती रात्री जागवलंस मला. सगळीकडे माझ्या आसपास असतोस. पण खराखुरा नसतोसच. देव सगळीकडे आहे, पण दर्शनाला देवळात जातातच ना? तसंच समज. तुझ्या अस्तित्वाने सगळं सुगंधी होत जातं. तुझ्याशी जोडलेलं हे नातं मी असंच जपणार आहे. तुझी परवानगी न घेता. चालेल ना? सोनेरी क्षणांचा सोबती असूनही अनभिज्ञ असलेला. खरोखर गाढव, एक नाही, शंभर!
तुझी,
वीणा

 आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

कॉलेजचे ते दिवस अजूनही आठवतात. तुझी भिरभिरती नजर, इकडे-तिकडे बघण्याचा खोटा प्रयत्न आणि हळूच चोरट्या नजरेने माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसणं. तुझ्या या प्रकाराचं मला खूप कुतूहल वाटायचं. तुझा तो शांत चेहरा सतत मला शोधायचा. कॉलेजच्या दुसऱ्या मजल्यावरून हळूच खाली वाकून बघणं आणि मी पाहिल्यावर लगेच मागे होऊन दुसरीकडे बघण्याचं नाटक करणं. या सगळ्याची मला खूप मजा वाटायची. नकळत मला त्याची सवय झाली आणि माझीच नजर तुला पाहण्यासाठी भिरभिरायला लागली. एव्हाना तुलासुद्धा हे समजलं होतं! आठवतं तुला? एकदा तुझ्या मित्रांसोबत सिगरेट ओढताना पाहिलं होतं. तुझ्या मागेच होते मी. तुला बघून क्षणभर मी तिथेच थांबले. मला बघून ती सिगरेट तुझ्या मित्राला दिलीस. तुझं ते वागणं आणि माझं तिथून निघून जाणं मला खूप विचित्र वाटत होतं. नकळत मीसुद्धा तुझ्या प्रेमात पडले. माझं सारं विश्वच बदललं तुझ्यामुळे. आपलं हे अबोल प्रेम खूप दिवस चाललं. कॉलेजचं शेवटचं वर्ष उजाडलं. आपल्या प्रेमातला एक असा टप्पा, जिथे प्रेम व्यक्त केलं, तर केलं आणि नाही केलं, तर कधीच नाही! बस्स्, ठरवलं की, मी पुढाकार घेईन. आज आपल्या प्रेमाला चार वर्षं झाली. या चार वर्षांत आपण अनेक संकटांना तोंड दिलं. तू माझी सोबत कधीच सोडली नाहीस. तुझ्या प्रेमाने मला जगण्याची नवी दिशा मिळाली. असं म्हणतात, की प्रेम कधी सुखासुखी मिळत नाही. हे खरं आहे. अपेक्षेप्रमाणे तुझ्या घरच्यांकडून विरोध होणार, हे मला माहीत होतं. पण प्रेम ठरवून तर होत नाही ना! शेवटी ते तुझे आईवडील. त्यांच्या भावना मी समजू शकते. पण मी? माझ्या भावना? त्यांचं काहीच मोल नाही? मी तुझ्यावर निस्वाथीर् प्रेम केलं. माझं आयुष्य तुझ्यापासून सुरू होतं आणि तुझ्यात संपतं. माझा विश्वास आहे माझ्या प्रेमावर. देव आपल्याला कधीच वेगळं नाही करणार. कारण या प्रेमाचा धागा त्यानेच बांधलाय. या चार वर्षांत मी तुझ्याकडे काहीच मागितलं नाही. आज एकच मागणं आहे. तू आपलं प्रेम घरच्यांसमोर उघड कर. प्रेमासाठी तू फक्त एक पाऊल उचल. तुझ्यासाठी मी सर्व आयुष्य देईन. तुझ्यासमोर येणाऱ्या प्रत्येक संकटांना तुझ्याआधी समोरी जाईन. चार वर्षांपूवीर् मी पुढाकार घेतला होता. आज मी तुझी वाट बघतेय. तू कधी पुढाकार घेशील?

- तुझीच,

सुचू


 आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी


 आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी


 आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी


तू माझ्या आयुष्यात आलास , तेव्हापासून माझ्या जीवनाला एक वेगळं वळण लागलं. कळलंच नाही , की मी केव्हा प्रेमात पडले. मी प्रथम तुला होकार दिला , तेव्हाही मला वाटत नव्हतं , की मी प्रेमात पडले आहे. या 14 फेब्रुवारीला आपल्या प्रेमाला तीन वर्षं पूर्ण झाली. पण अजूनही आपण नवीन असल्यासारखं वाटतं. या तीन वर्षांत बरंच काही घडून गेलं. थोडं रुसणं , थोडंसं हसणं... तरी आपल्यातील नावीन्य काही कमी झालं नाही. आपण एकमेकांमध्ये एवढं सामावून घेतलं आहे , की फक्त चेहऱ्याच्या हालचालीवरून आपल्याला काय बोलायचं आहे , हे कळतं. तू माझ्यासाठी काहीच केलं नाहीस , असं तुला का वाटतं ? तू माझ्यासाठी भरपूर काही केलं आहेस. आज मी जे काही आहे , त्याचं पूर्ण श्रेय तुलाच आहे. आज आपण अशा वळणावर उभे आहोत , की पुढे काय होईल , याची कल्पना नाही. आपला विश्वास , आपलं प्रेम हीच सर्वात मोठी शक्ती आहे. आपल्यातील नि:स्वाथीर् , निरपेक्ष प्रेमामुळेच आपण एकत्र आहोत. तू म्हणतोस ना , की आपलं प्रेम फार वेगळं आहे... ते खरंच वेगळं आहे. आपण एकमेकांवरचे हक्क एकमेकांना पूर्णपणे दिले आहेत. पण कोणत्याही अटी आणि वचनामध्ये आपण एकमेकांना बांधलं नाही. प्रेमाला कधीही मोजमाप नसतं. फक्त भरपूर प्रेम करत राहायचं असतं. कधीकधी वाटतं , की तू एवढं करतोस , तर मीच कमी नाही पडणार ना ? कुठे कमी पडले किंवा काही चुकलं , तर मला नक्की सांग. खरंच मला माझं प्रेम व्यक्त करता येत नाही. तुझ्यासारखं छान छान लिहिता-बोलता येत नाही. तू म्हणतोस ना , काहीतरी लिहित जा. ज्या गोष्टी आपण बोलू शकत नाही , त्या लिहून व्यक्त करता येतात. म्हणून हे फक्त तुझ्यासाठी. आत्तापर्यंत तू मला खूप काही दिलंस , मला समजून घेतलंस , खूप खूप प्रेम केलंस. आता फक्त एकच मागणं आहे , ' हृदयाचा ठोका चुकला तरी , तू मात्र चुकू नकोस , प्रेमाचं नातं परी , साथ कधी सोडू नकोस... '

- तुझीच

' रती '

प्रेम या शब्दाची व्याख्या अजूनपर्यंत कोणीही बनवू शकलं नाही. जो तो आपल्या मनानुसार प्रेमाची व्याख्या बनवतो. प्रत्येकजण आपल्या जीवनात एकदा तरी कोणत्या ना कोणत्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करतो. फक्त फरक एवढाच, की काहीजण आपलं प्रेम व्यक्त करतात आणि काही एकतर्फी प्रेमावरच जगतात. मलाही असंच काहीतरी जाणवलं, ते त्याला प्रथम पाहिल्यावर. कधीही प्रेमाचा खरा अर्थ समजलाच नव्हता. पण जेव्हा आमची नजरभेट झाली, तेव्हाच मी स्वत:चं मन अक्षरश: हरवून बसले. पहिल्यांदा मला वाटलं, या वयात मन चंचल असतं. जसजसं त्याला विसरण्याचा किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत गेले, तसतसा तो मनात उतरू लागला. त्याचं माझ्याकडे बघणं, माझं त्याच्याकडे बघून लाजून हसणं, डोळ्यासमोर त्याचा आणि फक्त त्याचाच हसरा चेहरा दिसणं यालाच तर म्हणतात प्रेम! प्रेम व्यक्त करायला वेळ लागला, तो आम्हा दोघांमुळेच. प्रेमाची मागणी घालायला पुढाकार कोणी घ्यावा, हे सुचेना. शेवटी त्याला भेटायला गेले, तेव्हा दोघांनाही भावना व्यक्त करायच्या होत्या. मीच पुढाकार घेऊन त्याला मागणी घातली. त्याने होकार दिला. तो दिवस म्हणजे, 14 फेब्रुवारी 2010. त्याच्यातले अनेक गुण मला आवडतात. त्याचा माझ्यावर विश्वास आहे. तो मला खूप समजून घेतो. अनेक गोष्टी समजावतो. त्याच्यातील हट्टीपणा मला नाही आवडत. तो त्याने थोडासा कमी करावा. निलेश, जेवढा तू माझ्यावर प्रेम करतोस, त्यापेक्षा थोडं अधिक प्रेम मी तुझ्यावर करते. हे मला तुला सांगावं लागत आहे, याचं मला वाईट वाटतं. तू एकदा मला विचारलेला प्रश्न अजूनही माझ्या लक्षात आहे. त्या एका प्रश्नामुळे मला खूप रडायला येतं. पुन्हा असे काही वाईट शब्द तोंडातून काढू नकोस, की त्यामुळे तुझ्या या वेडाबाईला रडू येईल. फक्त आणि फक्त तुझ्या प्रेमाची प्रेयसी.

- निलेशची निशा

प्रिय समीर,
' साया सा कोई आए, तो लगता है की तुम हो, आहट सी कोई छाए, तो लगता है की तुम हो!' तुझी आठवण येत नाही, असा एकही क्षण नाही. सध्यातरी डोळे बंद केले किंवा आरशात पाहिलं, तरी तूच दिसतोस. तू कधीही येतोस मनात आणि मन तुझ्या आठवणीत गुंतत जातं. तुझा चेहरा डोळ्यांसमोर तरंगत राहतो. क्या यही प्यार है? तसं तुला बऱ्याच वर्षांपासून पाहतेय मी. तुझ्यामुळेच सकाळी लवकर उठायची सवय लागलीय मला. शेजारच्या बिल्डिंगमध्ये रोज येतोस पेपर टाकायला. दिवसा दुसरी नोकरी करतोस. पटकन एक चोरटा कटाक्ष टाकते तुझ्यावर. ज्या जागी सायकल लावतोस, तिथे निरखून पाहते. तू नक्की केव्हापासून आवडायला लागलास, हे सांगण कठीणच आहे. अचानक एक दिवस तुला पाहून हृदयाची धकधक जोरात व्हायला लागली. तू खूप छान नाचतोस. तुझ्या डान्सची फॅन आहे मी. पण मला तुझ्या हव्यास नाही. आय थिंक, यू डिझर्व बेटर. कदाचित तुझ्या हातात एखादा हात असेलही. मनाची तयारी करून ठेवलीय मी. 29 सप्टेंबर हा तुझा बर्थ डे. सकाळी तू सायकल लावत होतास ना, तेव्हा मी मनातल्या मनात बर्थ डेचं गाण गात होते. फोन लावण्यापूवीर् मनात खूप काही बोलले. संध्याकाळी धीर करून नंबर डायल केला खरा. पण तुझा आवाच ऐकून शब्दच फुटेना. शेवटी 'हॅपी बर्थ डे' बोलून फोन ठेवून दिला. तुला नेहमी हसताना पाहायचंय. देवाकडे स्वत:साठी आनंद मागताना, तेवढाच आनंद आणि सुख तुझ्यासाठीही मागते. कधीतरी धीर करून तुझ्याशी नक्की बोलेन. तोपर्यंत काळजी घे. माझ्यासाठी स्वत:ची...आणि हो, महत्त्वाचं सांगायचं राहिलंय, की क्यँुकी इतना प्यार तुमसे करते है हम, क्या जानोगे हमारे सनम! समु, आय लव यू.

तुझीच

रितू, (ठाणे)

आता कळतंय, तुझ्या प्रेमात पडलेय ते. याआधी रोजची संध्याकाळ अशी कातर नव्हती. आता वेळ जाता जात नाही. पण सांगणार तरी कसं? तुला तर थांगपत्ताही नाही. तू आपला बेफिकीर, स्वच्छंद, आपल्याच मस्तीत असतोस. जगाकडे लक्ष द्यायला तुला वेळ कुठाय? ' मला 'नाही' ऐकायची सवय नाही,' हा तुझा हेका आणि जे हवंय ते मिळवायचा अट्टहास. माझे नियम वेगळे आहेत रे तुझ्यापेक्षा. तुझ्याइतकं फायदा-तोटा बघून नाही वागता येत मला. त्या क्षणाला जे वाटतं, ते करून टाकते मी. एका अर्थाने मीसुद्धा स्वच्छंदी आहे. पण तुझ्यासाठी तेवढीच हळवी, केअरिंग आहे. आजकाल 'मैंने प्यार किया'चं टायटल साँग मी अगदी तन्मयतेने ऐकायला लागलेय. स्वप्नात रमणं आवडतंय. कधीतरी अगदी खुश होऊन नाचावंसं वाटतं. बासरीच्या सुरांवर डोलावंसं वाटतं. कधी अचानक बेचैनी जाणवायला लागते, डोळे भरून येतात. इतक्या सहज माणूस प्रेमात पडतो? तू कधी प्रेम केलंस कुणावर? इतकं सुंदर, आश्वासक फीलिंग दुसरं कुठलंही नसेल. माहितीय, तुला सांगणं मला कधीच जमणार नाही. भीती वाटते, कुणी दुसरीच आवडत असेल तुला तर? नाही सहन होणार मला ते. त्यापेक्षा हे सीक्रेट माझ्यापुरतं राहूदे. फक्त माझ्यापुरतं! मनोमन वाट बघत राहेन तुझ्या विचारण्याची. पण नाहीच विचारलंस, तरी चालेल. रिमझिम पावसात भिजताना तू आठवतोस. असं वाटतं, आता अचानक मागून छत्री घेऊन येशील. 'किती भिजतेस?' असं म्हणून दटावशील आणि माझ्या हातात गरमागरम कॉफीचा कप ठेवशील. बघ, माझी मनोराज्य सुरू झाली. माझा आतला आवाज सांगतो, की तू कधीतरी येशील. मी दर पावसाळ्यात तुझी वाट बघेन. येशील ना?

- तुझीच

   आर्या

आपल्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येते, की ज्याच्यावर सर्वाधिक प्रेम करतो. जास्त विश्वास आपण त्याच्यावरच ठेवतो. तसाच माझ्या आयुष्यात गौरव आला. त्याला पहिल्यांदा मी कॉलेजमध्ये पाहिलं आणि मैत्री करावीशी वाटली. फ्रेण्डशिप डेच्या दिवशी मैत्रीही केली. असं वाटायचं, की फक्त त्याला बघत बसावं. त्याचा हास्यचेहरा बघून मला अनोखा आनंद व्हायचा. पण त्याच्याशी बोलण्याची हिंमत व्हायची नाही. फक्त त्याचाच विचार करावा, त्याच्याशिवाय सोबत कोणीही नसावं, असं वाटायचं. मनातलं हे गुपित माझ्या मैत्रिणींना सांगितलं आणि त्यांनी ते जाऊन गौरवला सांगितलं. पण त्याचं उत्तर आलं नाही मला. या गोष्टीचं काहीच दु:ख नव्हतं. कारण त्याच्या जागी मी असते, तर माझंही उत्तर तेच असतं. ज्या व्यक्तीशी मी फक्त मैत्री केली आणि ज्याच्याबरोबर फारसं बोललेही नाही, त्याला पटकन 'हो' सांगणं कठीण आहे. तरीही मी त्याच्यावर खूप प्रेम करते. त्याला एक दिवस पाहिलं नाही, तर 'मी कॉलेजला का आले,' असं वाटायचं. त्याच्याशिवाय माझ्या मनात दुसरा कुठल्याच मुलाचे विचार येणं शक्य नाही. काही दिवसांनंतर गौरव आमच्या वर्गात येऊन बसायला लागला. नेहमी मागे वळून आमच्या बेंचकडे पाहायला लागला. त्याचं ते पाहणं, आमची नजरानजर झाल्यावर त्याच्या मित्राकडे बघून बोलणं, पुन्हा बोलता बोलता माझ्याकडे पाहणं असं त्याचं वागणं यातून माझ्या मनात त्याच्याबद्दल आणखी प्रेम वाढलं. त्याच्या काही मैत्रिणी माझ्या वर्गात आहेत. त्यांच्याकडून गौरवबद्दल आणखी काही माहिती मिळाली. मला हे समजलं, की गौरवचं कोणत्याही मुलीबरोबर प्रेमप्रकरण नव्हतं. तो मैत्रिणींशी फक्त मैत्रीच्या नात्याने बोलतो. त्याचे आईवडील जी मुलगी शोधून देतील, तिच्याबरोबर त्याला लग्न करायचंय, हे ऐकून माझ्या मनात गौरवसाठी जी इज्जत होती, ती अधिक वाढली. जो एका मित्राचं आणि मुलाचं कर्तव्य इतक्या चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतो, त्याला चांगली व्यक्ती म्हणता येतं. प्रत्येक मुलगी हेच स्वप्न पाहत असते, की तिचा जोडीदार चांगला असावा. पण प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होत नाही. गौरवशी बोलण्याचा प्रयत्न माझा सुरूच होता. पण तो समोर आल्यावर माझ्या तोंडातून शब्द निघत नाहीत. त्याचं ते तिरप्या नजरेने पाहणं मला अस्वस्थ करतं. त्याचं त्याच्या मैत्रिणींशी जास्त बोलणं पाहून मला खूप वाईट वाटायचं. माझा उदास चेहरा पाहून माझ्या मैत्रिणीने त्याला सांगितलं. पण त्याचं उत्तर आलं नाही. तो माझ्यावर प्रेम करत नसेल, तर? नसो, पण मी त्याच्यावर खूप प्रेम करत होते, करते आणि करत राहणार. म्हणतात ना, खरं प्रेम असलं, की ती व्यक्ती स्वत:हून आपल्याकडे येते... माझं मन आजही त्याला पाहण्यासाठी, बोलण्यासाठी व्याकूळ झालेलं असतं. गौरव स्वत:हून माझ्याजवळ येईल, त्या क्षणाची मी वाट बघतेय. या जन्मी गौरव माझा झाला नाही, तर देवाला मी सांगेन, की पुढच्या जन्मी माझा साथीदार फक्त गौरव असावा...

त्याचीच,

- गौरवी

प्रेमात पडणं वगैरे सब झूठ असतं, असं मानणारी मी. आजूबाजूला गळ्यात गळे घालून फिरणारी प्रेमी युुगुलं पाहिली, की हा माझा मार्ग नव्हे, असं मानणारी मी. एकाच कंपनीत काम करताना सुरुवातीला तुझ्याशी तुटकपणे, जितक्यास तितकं वागणारी मी... तू कधी माझ्या हृदयाचा ताबा घेतलास, हे मात्र कळलंच नाही मला! ' मैत्रिणीकडे संत्र्याच्या झाडाचं बोन्साय पाहिलं. एवढ्याशा कुंडीतल्या झाडावर केवढी तरी संत्री लागलेली होती. मोठ्या उत्साहात मी तुला सांगितलं. त्यावर एकदम उसळून तू म्हणालास, 'बोन्साय? छे, मला नाही आवडत हे असले प्रकार. माणसाच्या फायद्यासाठी केलेलं क्रौर्य आहे हे. अगं, झाडांनाही मन असतं. मुक्तपणे त्यांना वाढू द्यायचं. आपल्या स्वातंत्र्यावर गदा आली, तर किती राग येतो आपल्याला! तसाच त्यांनाही येत असेल. पण ती झाडं बिचारी बोलू नाही शकत. जे आपल्या भावना व्यक्त करू शकत नाहीत, अशांच्या भावना आपण जाणून घेऊ शकत नसू, तर माणूस म्हणायच्या योग्यतेचेच नाही आपण!' छोटीशीच घटना, पण झाडांच्याही भावना समजून घेणारं तुझं तरल संवेदनशील मन मला अगदी खोलवर आवडून गेलं. माझ्याबाबतीतली प्रत्येक गोष्ट तुला सांगितल्याशिवाय मग मला चैनच पडेनासं झालं. एखाद्या दिवशी मूड नसेल, तर काहीतरी जोक्स सांगून तुझं हसवणं, रागावणं, रुसणं हे सारं मला आवडू लागलं. मला म्हणायचास, की डोळ्यांनी बोलायला शिक. प्रत्येक गोष्ट शब्दात सांगता येत नाही. तुला ती कला चांगलीच अवगत आहे. माझ्या डोळ्यांनी मात्र माझ्याही नकळत माझ्या मृदू भावना तुझ्यापर्यंत पोहोचवल्या असाव्यात. तुझ्याबद्दलच्या भावनांचा माझ्याआधी तुला सुगावा लागला. पण त्या वेळेपासून तू स्वत:ला अलिप्तच ठेवायला लागलास. राधेने श्रीकृष्णाला 'निमोर्ही' असं म्हटलं होतं. दुसऱ्याला आपल्या मोहात पाडायचं आणि स्वत: मात्र कमलदलाप्रमाणे अलिप्त राहायचं. तसंच काहीसं मला तुझ्याबाबतीत वाटू लागलंय. मला माहीत आहे, जात-वय यासारख्या समाजाने घातलेल्या बंधनांमुळे आपण नाही एकत्र येऊ शकत. पण प्रेमात काय आणि युद्धात काय, सारं काही क्षम्य असतं, असं म्हणतात, ते खोटंच म्हणावं लागेल. कुठेतरी वाचलंय, की प्रेम हे प्रतिध्वनीसारखं असतं. जितक्या तीव्रतेने तुम्ही एखाद्यावर प्रेम कराल, तितक्याच तीव्रतेने ते तुमच्याकडे परत येईल. पण ज्याअथीर् ते माझ्याकडे परत येत नाहीय, त्याआथीर् मी असं समजेन, की माझ्याकडून तितकं प्रेमच केलं गेलं नसावं... पण... हेही खरं मानायला माझं मन तयार होत नाही. आता असं वाटतं, की उगीचच आपली भेट झाली. उगीचच इतकी ओळख झाली. या जन्मी जर शक्य नसेल, तर निदान पुढच्या जन्मी तरी असं राधा नाही... 'रुक्मिणी' व्हायचंय मला!-

तुझी,

माधुरी

प्रेम ही कल्पना मनाला स्पर्शून जाते. ही भावनाच निराळी आहे. प्रेमाची व्याख्या सगळे करतात. माझी व्याख्या वेगळी आहे. एकमेकांना समजून घेतलं, विश्वास ठेवला, विचारांची तडजोड केली, तरच संसार सुखाचा होतो. मी तुझ्यावर प्रेम केलं. तुला समजून घेतलं, तुझ्यावर विश्वासही ठेवला. तुला मी आवडत होते, तर का तुला असं वाटलं, की आपलं प्रेम संपवून टाकू या? केवळ ग्रुपमधल्या मैत्रिणी तुला काहीतरी बोलल्या आणि तू मला सोडण्याचा निर्णय घेतलास. असं का वागलास? काय कारण होतं, माझं प्रेम तोडण्याचं? का मला टाळत होतास? हे सर्व प्रश्न माझ्या मनात घर करून आहेत. मी तुला विचारलंही, पण तू मला टोलवाटोलवीची उत्तरं दिलीस. म्हणून यापुढे तुला प्रश्न विचारणार नाही. तू स्वत:हून सांगशील, याची वाट बघेन. प्रेम तोडण्याचं कडू विष मला प्यायला लावलंस. पण तू सुखात राहावंस, एवढीच माझी इच्छा आहे. शैलेश, तुला आठवतात, आपण सोबत घालवलेले दिवस? 14 फेब्रुवारी 2004 ते 26 ऑक्टोबर 2004 हे माझ्यासाठी अनमोल क्षण आहेत आणि यापुढेही असतील. आयुष्यात कधीही विसरता येणार नाहीत. तुला वाटत असेल, की मी खोटं बोलते. पण यातला शब्दन्शब्द खरा आहे. माझ्या आयुष्यात तुला किती महत्त्वाचं स्थान आहे, हे तुला माहीत नाही. माझं प्रेम खरं आहे रे तुझ्यावर. मला तुझी मैत्री गमवायची नाही. प्रेमाआधी जी मैत्री होती, ती मला हवी आहे. मनातलं सर्व काही तुला सांगितलं असतं, पण कदाचित तू ऐकलंही नसतंस. एकाच ग्रुपमध्ये राहून तुला माझ्याशी बोलायला वेळ मिळत नाही ना! म्हणून माझ्या मनातला भावना तुला पत्राने कळवण्याचा निर्णय घेतला. हे सर्व मी तुझ्यासाठीच केलं. मी तुझ्यातला प्रियकर गमावला. तुझ्यातला मित्र गमवायचा नाही. तू सांगशील, ते मान्य करेन, पण माझ्याशी मैत्री तोडू नको. ही मैत्री निर्मळ, निखळ असेल. प्रेमाचा एकही विषय मी काढणार नाही. तू सुखात राहा, हीच प्रार्थना मी रोज करते आणि करत राहेन. तुला कधीच विसरू शकत नाही. ज्याला आपण विसरतो, त्याची आठवण येते. तू नेहमी माझ्या मनात राहतोस. तुझ्या सुखासाठी काहीही करायला तयार आहे. म्हणून तर प्रेम संपवून टाकलं, तरी तुझी मैत्री नाही संपवली. तुला माझ्या या भावना कळल्या, तर मी सर्व काही जिकलं. माझं प्रेम आजही तूच आहेस, उद्याही तूच राहशील, तू माझ्यासोबत राहा किंवा नको राहू, आयुष्यभर तुझ्या आठवणी माझ्यासोबत राहतील. प्रेम करते तुझ्यावर, तिरस्कार करू नकोस, आयुष्यात माझ्याशी कधीही बोलणं सोडू नकोस. सर्व सहन करेन मी, पण तुझा अबोला नाही. सदैव सुखात राहा, आयुष्यात पुढे जात असताना एकदा तरी मागे वळून पाहा. उभी असेल तिथे फक्त तुझी मैत्रीण, मैत्रीचा हक्क तरी माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस.-

तुझी मैत्रीण,

सोनी

माझ्या मनातील प्रत्येक भाव तू ओळखला आहेस. तुझ्यापासून काहीच लपून राहिलेलं नाही. तुझ्याही मनात माझ्याबद्दल प्रेम, आस, कोमल भावना आहे. माझ्याही मनात तेच आहे. तरीही आपण दूर आहोत. का? कशासाठी? या भेकड समाजासाठी की या समाजाला घाबरणाऱ्या आपल्या आईवडिलांसाठी? कुणी बनवला हा समाज? आपणच. मग याला का घाबरायचं? तुझी आणि माझी जात वेगळी आहे, म्हणून आपण दूर-दूर राहायचं? मला नाही पटत हे सगळं. खरं सांगू, हे सगळं मी तुच्छ मानते. या जगात सर्वश्रेष्ठ मैत्री आणि प्रेम या दोनच गोष्टी खऱ्या आहेत. त्या नि:स्वाथीर् असतात आणि जर या गोष्टी नि:स्वाथीर् नसतील, तर त्या खऱ्याही नसतात. तुझ्या प्रेमात पडल्यापासून मी बरंच काही शिकले. प्रेम सगळं शिकवतं, असं म्हणतात ना, ते खरं असल्याचं मी अनुभवलं. तुझ्या प्रेमाने मला कवी बनवलं. सहनशील, स्वतंत्र विचारसरणीचं नम्र व्हायला लावलं. स्पर्शाशिवायही आधार देता येतो, याची तुला उत्तम जाणीव आहे. तुझा बोलका चेहरा सतत माझ्यासमोर असतो आणि तो पाहून माझी लेखणीही उत्तर देऊ लागते. तुझं ते गोड हसणं पाहून कुणी फिदा नाही झालं, तरच नवल. तुझा खेळकर स्वभाव कुणालाही आपलंसं करतो. तुझ्या शुद्ध आणि नि:स्वाथीर् हसऱ्या-गोड स्वभावामुळेच मी तुझ्यात कधी गुंतत गेले, कळलंच नाही. कदाचित आपलं प्रेम मोठ्यांच्या नजरेत चुकीची गोष्ट असेल. पण प्रेम करताना मी त्यांची परवानगी घेतली नव्हती. आताही मी घाबरत नाही. तुझा स्वभाव 'मोडेन पण वाकणार नाही,' असा आहे. मग आपण चुकत नसलो, तर भीती कशाची? प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाचे गोड क्षण येतात. ते लग्नाआधी आले, तर त्याला मान्यता मिळत नाही. का? ते मलाही माहीत नाही. पण मला इतकं नक्कीच ठाऊक आहे, की तू माझा आहेस... फक्त माझा! आयुष्यात प्रत्येकाने एकदा प्रेम केलंच पाहिजे, लोकं म्हणतात, प्रेम ही एक सजा आहे, पण त्यांना कुठे ठाऊक असतं, की झुरण्यात काय मजा आहे...

- फक्त तुझीच,
कीर्ति 

तुला पाहिलं आणि प्रेम या शब्दाचा अर्थ समजला. प्रीतीचं फूल तुलाच अर्पण केलं. तुझ्या त्या पहिल्याच प्रेमळ नजरेच्या दवबिंदूत भिजून गेले मी आणि मग कळलंच नाही , की कधी तुझ्यात इतकी गुंतले मी! तुझ्याही मनाच्या प्रीतबागेत प्रीतीचा केवडा फुलला होता आणि मी तर तुझी राधा झाले होते. पण... पण का कुणास ठाऊक , तू माझ्यावरील प्रेम व्यक्तच केलं नाहीस. मी मात्र प्रीतीच्या शांत किनाऱ्यावर तुझ्या होकाराच्या प्रतीक्षेत बसून राहिले. आपलं प्रेम अबोलच , तरीही ते एकमेकांच्या मनाला जाणवत होतं. म्हणूनच तर... तू वळून पाहिलंस. तुझा तो एक दृष्टिक्षेप... त्या क्षणाला वाटलं. तू फक्त माझा आहेस. फक्त माझा. मी धावले तुझ्या मिठीत विसावण्यासाठी. वाटलं , की विरघळलास माझ्यात तू. पहिली मी आणि नंतर तू असं आपलं वेगळं अस्तित्व आता उरलेलं नाही. पण...तो निव्वळ माझा भ्रम होता. माझ्या हातात गवसली , ती फक्त तुझी सावली. तीही सूर्यास्तानंतर माझ्या हातून निसटली रे..! माझी ओंजळ रिकामी ती रिकामीच. ते दिवस मात्र मोरपंखी होते. आरशात चेहरा पाहताना भाळी लावलेला चंद कसा दिलखुलास हसायचा. केसात माळलेला गजराही मग लाजायचा. मन पाखरू झालं होतं. तुझ्याच अवतीभोवती ते रुंजी घालत राहायचं. आता मात्र... सारंच चित्र बदललंय. आता पूवीर्सारखे गुलाब आवडत नाहीत मला. रातराणीच आवडते. कारण रात्रभर तीच एक सोबत देते. माझ्या माळ्यावरचा चंदही रुसलाय. तुझ्या आठवणींची रोज मैफल भरते आणि डोळ्यांतून श्रावणसरी बसरते. तरीही मनात एक आशा सूयोर्दयाबरोबर जन्म घेते. अजूनही वाटतं , की तू येशील. ओल्याचिंब देहानेच मला कवेत घेशील आणि म्हणशील , ' फक्त तुझ्यासाठी आलोय. तुझी प्रतीक्षा संपली. आपण एक प्रेमनगर वसवू. माझी हृदयस्वामिनी आहेस तू. ' माझ्या स्पर्शाचा नाजूक गुलाब टिपशील तू एखाद्या गुणगुणाऱ्या भ्रमरासारखा. माझ्या केसातील गजराही लाजेल. माझ्या माळ्यावरील चंदही हसेल पुन्हा. आपलं अबोल प्रेम बहरेल , फुलेल. मला अजूनही वाटतं. तू परत येशील , आपल्या अबोल प्रेमाला शब्दांचं दान देशील. येशील ना साथी ?

-

जीवनाच्या वाटेवर किती जण भेटतात, त्याची गणती नसते. पण गणतीत न बसणारे तुझ्यासारखे क्वचितच असतात. क्षणभुंगर जीवनात प्रत्येक जण जगायचा असतो आणि मी तुझ्या सहवासात तो जगत आहे. तुला पाहिलं, तेव्हापासून एक अनामिक ओढ लागली. तुला जाणून घ्यायची प्रबळ इच्छा मनात घर करू लागली. पण नेमक्या शब्दात मांडता येत नाही... कोणत्याही नात्याची सुरुवात प्रथम मैत्रीतूनच होत असते. मी त्याला आवडते, हे त्याने जरी प्रत्यक्ष व्यक्त केलं नसलं, तरी त्याच्या डोळ्यातील भाव खूप काही सांगून गेले. शब्दाविना झालेला संवाद हृदयापर्यंत पोहोचला अन् स्वर्गसुखाचा आनंद मिळाला. त्याला 'आय लव्ह यू' हे शब्द फार बोथट, उथळ वाटतात. त्याची भावना तीन शब्दात मावणारी नव्हती. आमचं प्रेम फार समंजस आहे. त्यातही समान प्रेम देण्याची आणि घेण्याची वृत्ती असल्यामुळे ते अधिकच दृढ झालंय. माझा छोटासा आनंद, दु:ख मी तुला सांगावं अन् तू मला ते समजवून सांगावंस, असं वाटतं. तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. म्हणूनच तर तुझ्यापासून दूर राहावंसं वाटत नाही. पण या अशा समंजस प्रेमात माझ्याकडून एक चूक घडली. ती म्हणजे, दुसऱ्याच्या बोलण्यावरून त्याच्यावर संशय घेतला. तेव्हा त्याला फार वाईट वाटलं. कारण जसं कोणतंही नातं विश्वास, आपुलकीवर आधारलेलं असतं, तसं आमचंही आहे. चूक उमगल्यावर फार पश्चात्ताप झाला. त्याबद्दल माफी मागते. तू आधी कविता वगैरे करायचास, ते आज बंद केलंस, याचं वाईट वाटतं. कारण कवितांच्या माध्यमातून आपण आपल्या भावना, सुखदु:ख व्यक्त करत असतो. माणसाने वेळात वेळ काढून आपला छंद, कला जोपासायला हवी. म्हणून तू पुन्हा कवितेच्या विश्वास रमून मन प्रफुल्लित ठेव, हीच माझी इच्छा आहे. दूर राहूनही तुझी साथ मला हवी आहे... देशील? प्रेमाने ओतप्रोत भरलेले शब्द साठवून माझं ध्येय गाठायचंय. त्यासाठी बळ मला तुझ्याकडून हवंय... देशील ना? प्रेमात बंधनं, मर्यादा काही स्तरावर असाव्यात, कारण ती अंतरीची ओढ असते. जमेल तसं घ्यायचं अन् जमेल तसं द्यायचं असतं. पण त्याच्यासाठी एक जिवंत मन असावं लागतं. प्रेमाचे क्षण वेचायला आणि टिपायला, हो ना?

- तुझीच,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

विसरू नको रे आई बापाला

मराठा आणि ब्राह्मण वाद.....