गाडगे महाराज

"तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ,अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तीपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू  नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दिन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव.या देवांतच गाडगेबाबा अधिक रमतअसत.
डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात शेणगाव नावाच्या खेड्यात २३ फेब्रुवारी सन १८७६ रोजी गाडगेबाबांचा जन्म झाला. त्यांचे वडिल झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव ''डेबूजी" असे ठ्वले होते. डेबूजी लहान असतानाच त्यांचे वडिल दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे डेबूजींचे बालपण त्यांच्या मामाकडेच गेले. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत.त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले.
मुखाने देवाचे नाव घेत गावोगाव बाबा फिरत, दिसेल त्या गावातील रस्ते, गटारे, देवालये, नद्यांचे घाट कोणाशीही न बोलताच ते स्वच्छ करू लागत. तसे करताना त्यांना पाहिल की , गावातील इतर माणसे आपापली कुदळ, फावडी, टोपल्या, खराटे घेऊन बाबांच्या मदतीला येत असत. मग रात्री याच लोकांना एकत्र करून बाबा कीर्तनाच्या सहाय्याने त्याची मने साफ करत.  गाडगेबाबांचे सारे सामर्थ्य कीर्तनात होते. एरवी कोणाशी न बोलणारे बाबा कीर्तनासाठी उभे राहिले की; शब्दांचा, साहित्याचा सद्विचारांचा असा काही मारा करत की; ऐकणारा मंत्रमुग्ध होत असे. गाडगेबाबा स्वतः काही शिकलेले नव्हते. त्यांना लिहिता-वाचताही येत नसे. असे असूनही बाबा उत्तम भजन करत. तुकोबांचे अभंग, कबीराचे दोहे त्यांच्या मुखातून अगदी सहजतेने निघत. पोथ्या-पुराणे, परमेश्वर, अध्यात्म या सार्‍या नेहमीच्या कीर्तन विषयांना बाजुला सारून बाबा स्वतःच्या अनुभवाच्या माध्यमातून लोकांच्या मनातील जुन्या समजूती, अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करीत. तबला, पेटी, टाळ, वीणा या कीर्तन साहित्याला हाताशी न धरता केवळ रस्त्यावरचे दोन दगड, टाळ्या आणि ' गोपाला गोपाला, देवकि नंदन गोपाला' असा घोष एवढ्याच भांडवलावर प्रचंड जनसमुदायाला मंत्रमुग्ध करण्याचे सामर्थ्य बाबांच्यात होते.
अशाप्रकारे स्वतः निरक्षर असलेले गाडगेबाबा कर्ते समाजसुधारक व शिक्षणप्रसारक होते. त्यांनी स्वतःला कधी देव मानले नाही ; की कोणाला स्वतःच्या पायाला स्पर्श करू दिला नाही. समाजसेवा हेच एक व्रत घेतलेल्या या महान संताचे २० डिसेंबर सन १९५६ रोजी निधन झाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

विसरू नको रे आई बापाला

shivaji महाराज.......