राष्ट्रसंत गाडगेबाबा

निष्काम कर्म, समाजसेवा व मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा मानणारे संत गाडगे महाराज हे आधुनिक संत होऊन गेले. त्यांनी माणुसकीचा संदेश देत देत स्वच्छतेचा व मानवतेचा नवा धर्म समाजात रुजवला. समृद्ध समाज घडवण्याकरिता आयुष्यभर समाजातील तळागाळातील अंध, अपंग, रोगी, दीन, दु:खी, निराश्रित, आदिवासी व दलित बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी ते आयुष्यभर झगडले. सेवा परमो धर्म हा मूलमंत्र त्यांनी जगाला दिला. आयुष्यभर चिंध्यांचे वस्त्र पांघरणारा, सारे गाव स्वच्छ केल्यावर तळहातावर भाकरी घेऊन खाणारा, मोठमोठ्या धर्मशाळा, वसतिगृहे, आदिवासी आश्रमशाळा, महाविद्यालये बांधूनही आयुष्यभर झोपडीत राहणारा, श्रमाची उपासना करायला सांगणारा, कोट्यवधी रु. च्या देणग्या लाभल्या तरी एका पैचाही मोह न ठेवणारा, आयुष्यभर कीर्तनाद्वारे गोरगरिबांना समुपदेशन करणारा... अशा या थोर निष्काम कर्मयोगी संत गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील भुलेश्वरी नदीच्या तीरावर असलेल्या शेंडगाव येथे 23 फेब्रुवारी 1876 रोजी झाला. त्यांचे खरे नाव डेबुजी झिंगराजी जाणोरकर. रंगीत चिंध्या हे त्यांचे महावस्त्र. गाडगे, काठी, कानात कवडी आणि पायात दोन प्रकारच्या चपला हे त्यांचे अलंकार. त्यांचे भोजन म्हणजे कांदा,
मिरची, भाकरी.
गाडगे महाराजांनी 1905 मध्ये मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी रात्री ऐन तारुण्यात संसाराचा त्याग केला. पुढे महाराष्ट्रामध्ये गावोगावी, खेड्यापाड्यातून जनस्थितीची पाहणी केली. विद्येविना अंधश्रद्धांना बळी पडून समाजाचा होणारा अध:पात त्यांनी प्रत्यक्ष पाहिला. काम केल्याशिवाय कुठलेही अन्न ग्रहण केले नाही. जनतेची बोलणी सहन केली पण त्यांनी आदर्श समाजाच्या बांधणीसाठी अत्यंत साध्या सोप्या गोष्टींचा संदेश, उपदेश जनतेला दिला. पृथ्वीच देवांचे देऊळ आहे. सूर्य हा खरा देव आहे. त्याला नमस्कार करा, असे ते म्हणत. निर्व्यसनाने मनुष्य लक्षाधीश होतो तर व्यसनाने तो भिक्षाधीश होतो. बाबांचे कीर्तन ऐकून हजारो, लाखो मद्यपी व्यसनमुक्त झाले व त्यांचे उद्‌ध्वस्त झालेले संसार पुन्हा
सावरले. साक्षरता शिक्षण ही समाजसुधारणेची गुरुकिल्ली आहे. बाबांचे शिक्षणकार्य म्हणजे महात्मा जोतिबा फुले यांचे साकारलेले स्वप्न आहे. त्यांनी राज्यभर शाळा, वसतिगृहे, आदिवासी आश्रमशाळा, महाविद्यालये काढली.
स्वच्छतेचा मूलमंत्र सांगणारे ते पहिलेवहिले समाजसुधारक होते. त्यांनी केवळ स्वच्छतेचा संदेश जनतेला दिला नाही, तर स्वत: हातात खराटा घेऊन संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. जी मोहीम राबवायला शासनाला लाखो रुपये खर्च आणि वेळ लागला असता. बाबांच्या या कृतीने स्वच्छता, लसीकरण यामुळे रोगराईला आळा बसला.
माणसातला माणूस जागा करणे, हा उद्योग त्यांनी आयुष्यभर केला. जनतेला शिकवण्याची बाबांची रीत वेगळी, भाषा वेगळी, लिपीही वेगळी. पृथ्वी हीच त्यांची पाटी, धरती हाच त्यांचा कागद, खराटा हीच त्यांची लेखणी, स्वच्छता हाच त्यांचा समाजधर्म, जीवन हा त्यांचा ग्रंथ, चिंध्या हे त्यांचे महावस्त्र होते. अशा या महामानवाचे महानिर्वाण वलगाव, जि. अमरावती येथे पेढी नदीच्या पुलावर गुरुवारी रात्री 12.30 वा. 20 डिसेंबर 1956 मार्गशीर्ष वद्य चतुर्थीला झाले. आज बाबा हवे होते, खरा धर्म जगवायला; समाजवाद न कळणाऱ्यांना तो पुन्हा एकदा सांगायला!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

विसरू नको रे आई बापाला

shivaji महाराज.......