रामनवमी

रामायणातील प्रभू श्रीरामचंद्र ऐतिहासिक होते की नाही यावर रामसेतूच्या निमित्ताने वादंग सुरू आहे. त्यांना ऐतिहासिक मानले तर आठ ते दहा हजार वर्षापूर्वी अयोध्येचा हा क्षत्रिय राजा , सीतामाई आणि लक्ष्मणासोबत गोदाकाठी महाराष्ट्रात आला होता. तेव्हा महाराष्ट्र दंडकारण्याचा एक भाग होता आणि अनेक ऋषी इथं नवी संस्कृती रुजवत होते. श्रीरामांनी या प्रयत्नाला खरा आकार दिला.

रामाच्या वास्तव्याचे दाखले देणारी तीर्थक्षेत्रे मुंबईच्या वाळकेश्वरपासून नागपूरच्या रामटेकपर्यंत सर्वत्र पसरली आहेत. मध्ययुगीन काळात महाराष्ट्रातील संतानीही रामाला आपलं दैवत मानलं. म्हणूनच वारकरी संप्रदायाच्या एकनाथांनी भावार्थ रामायणाची रचना केली आहे. पण महाराष्ट्राला रामभक्तीची दीक्षा दिली ती समर्थ रामदास स्वामींनी. ‘ जय जय रघुवीर समर्थ ’, असा मंत्र एक काळ महाराष्ट्रात घुमत होता. तो मंत्र होता रामभक्तांच्या संप्रदायाचा. त्याची स्थापना रामदासांनी केली होती.

राम महाराष्ट्रात कुठे कुठे गेला आणि तिथे काय काय घटना घडल्या याबद्दल ब-याच आख्यायिका प्रसिद्ध आहेत. रामानेच शिवपूजेसाठी वाळूचं शिवलिंग घडवलं तो वालुकेश्वर. तेच ठिकाण आज वाळकेश्वर म्हणून ओळखले जाते. या परिसरात राम काही काळ वास्तव्यास होता , असं मानतात. तिथून जवळच सीतेला तहान लागली म्हणून रामाने बाण मारून तिथे एक तलाव तयार केला , तो परिसर म्हणजे बाणगंगा.

नाशिकमध्ये तर पंचवटी , काळाराम मंदिर , सीता गुंफा , रामकुंड , अंजनेरी या ठिकाणांना वेगळंच पौराणिक महत्त्व आहे. किंबहुना , नाशिक हे नावंही रामायणातल्या एका घटनेमुळेच पडल्याचं अभ्यासक सांगतात. याच ठिकाणी लक्ष्मणानं शूर्पणखेचं नाक कापलं होतं. वनवासाच्या १४ वर्षांच्या काळात बराच काळ राम , लक्ष्मण आणि सीतेनं पंचवटीमध्ये व्यतित केला होता. तिथे पाच वडाची झाडं आहेत , म्हणून ते पंचवटी.

प्रसिद्ध काळाराम मंदिर पंचवटीतच आहे. पेशवेकाळात हे मंदिर बांधलं गेलं. काळ्या पाषाणातही रामाची देखणी मूर्ती या देवळात आहे. त्याशिवायही बरीच मंदिरं इथं आहेत. पंचवटीतच सीता गुंफा आहे. या गुहेत सीता काही काळ राहिली होती , असे म्हणतात. तिथे ते शंकराची पूजा करत. इथून जवळच लक्ष्मण रेषा आहे आणि तिथूनच रावणाने सीतेचं अपहरण केल्याचं मानलं जातं.

रामकुंड हे पंचवटीतील हे सर्वात महत्त्वाचे ठिकाण. पंचवटीतील वास्तव्यादरम्यान रामप्रभू इथं स्नानासाठी येत असत. याच ठिकाणी पिता दशरथाच्या अस्थींचे विसर्जन रामाने केलं , असंही म्हटलं जातं. येथे अस्थिविलय कुंड आहे. तेथे विसर्जित केलेल्या अस्थी वाहून जात नाहीत , तर वितळतात , अशी श्रद्धा आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात शाहीस्नान याच कुंडात होतं.

नागपुरात रामटेक आहे , तिथेही रामानं वास्तव्य केलं होतं. नागपूर शहराच्या पूर्वेला एक उंच डोंगर आहे त्यावर प्रभू श्रीरामाचं सुमारे ६०० वर्षं जुनं मंदिर आहे. संस्कृत काव्यातील एक अभिजात कलाकृती म्हणजे ‘ शाकुंतल ’ . कवी कुलगुरू कालिदासाने हे काव्य रामटेकमध्येच लिहिलं आहे.

उत्तर महाराष्ट्राला लागूनच गुजरातेतल्या डांग जिल्हात वनवासादरम्यान श्रीराम गेले होते आणि तिथेच त्यांची व शबरीची भेट झाली , असं मानतात. एवढी सगळी स्थळं उपलब्ध असताना , श्रीरामांनी महाराष्ट्रात बराच काळ वास्तव्य केलं , हे स्पष्ट होतं.

त्याशिवाय , ‘ स्वयें श्रीराम प्रभू ऐकती , कुश-लव रामायण गाती ’ या गदिमांच्या शब्दांवर आणि बाबूजींच्या स्वरांवर अवघ्या महाराष्ट्रानं प्रेम केलं. गीतरामायण अजरामर झालं. मग हा महाराष्ट्र प्रभू श्रीरामांचाच , नाही का ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

मराठा आणि ब्राह्मण वाद.....

shivaji महाराज.......