bretish sarkar
एका ब्रिटिश शिक्षणतज्ज्ञाने भारतीय विद्यार्थ्यांचे भावजीवन लक्षात घेत त्यांना कळेलशा उदाहरणांद्वारे इंग्रजी भाषेचे शिकवलेले पाठ असेच ‘एव्हरीडे इंग्लिश’(भाग पहिला, भाग दुसरा) या पुस्तकाचे वर्णन करता येईल. कल्पक आणि गमतीशीर खेळांमधून इंग्रजीचे धडे देणारे हे पुस्तक ज्योस्ना प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.
जेन साही या मूळच्या ब्रिटिश. १९७० सालापासून त्या भारतात स्थायिक झाल्या. बंगळुरूजवळच्या सिल्वेपुरा गावात त्यांनी सुरू केलेल्या ‘सीता’ या अनौपचारिक शिक्षण देणाऱ्या शाळेने भाषा, कला आणि विज्ञानविषयक शिक्षणासाठी नावलौकिक कमावला आहे. जेन यांना भाषा अध्यापनामध्ये विशेष स्वारस्य आहे.
या पुस्तकात इंग्रजी भाषेची ओळख अत्यंत साध्या-सोप्या शैलीत करून देण्यात आली आहे. पुस्तकाच्या पहिल्या भागात छोटे शब्द, क्रमांक, रंग, वार यांची ओळख, त्याचं स्पेलिंग वेगवेगळ्या कल्पक पद्धतींने सांगण्यात आलं आहे. मुलांना परिचयाच्या अशा विषयांतून इंग्रजीची करून दिलेली ओळख त्यांना निश्चितच लक्षात राहण्याजोगी आहे. कुटुंब, मित्र, घर, किचन, बगिचा, शाळा अशा गोष्टींची छोटय़ा - छोटय़ा इंग्रजी वाक्यांमधून परिचय करून देण्यात आला आहे. शरीररचना, प्राणी, पक्षी, कीटक यांचीही सचित्र ओळख या पुस्तकांद्वारे मुलांना होते. भाषिक खेळांमधून ही सारी माहिती मुलांना मिळत असल्यामुळे ती अधिक रंजक बनते. साध्या-सोप्या इंग्रजी कविता आणि गोष्टींमधून ही भाषा मुलांना अधिक परिचयाची होईल, ही निश्चित. वेळापत्रक बनवणं, साधीसोपी गणितं सोडवणं यासाठी आवश्यक असणाऱ्या ‘फंक्शनल इंग्लिश’ची ओळख या पुस्तकातून वाचकांना करून देण्यात आली आहे.
‘एव्हरीडे इंग्लिश’ या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात इंग्रजी भाषा शिकवताना भारतीय विद्यार्थ्यांचे भावजीवन लक्षात घेतले आहे. मुख्य म्हणजे शहरापलीकडच्या विद्यार्थ्यांचे दैनंदिन जगणे साध्या-सोप्या इंग्रजीतून अधोरेखित करण्यात आले आहे. भाषेसंबंधातील इंग्रजी व्याकरण, स्पेलिंग आणि उच्चार या वेगळ्या पैलूंची ओळख या पुस्तकात देण्यात आलेल्या अनेक उदाहरणं आणि चित्रांमधून होते. ही पुस्तके केवळ भाषिक आनंद देत नाहीत, तर त्या पलीकडे पोचून विज्ञान, पर्यावरण, गणित, सामान्य ज्ञान, नातेसंबंध, वर्तणूकशास्त्र याचे ओघवते संदर्भही पुस्तकात येतात आणि म्हणून मुलांना ही पुस्तकं वाचायला गंमत येते. या दोन्ही पुस्तकांतील कल्पक अॅक्टिव्हिटीजमुळे मुलांना या भाषिक समस्या सोडवायला उत्तेजन मिळतं.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा