slok srawan samwar cha


श्लोक ७ ते ९
सर्ववेदविद्यासांख्यशास्त्र I शैवागम योगशास्त्र I
कोणी एक पढती वैष्णवशास्त्र I श्रेष्ठ हितकर जाणुनी II
जैसे आकाशातून भूमीवर I पडले पाणी गाठी सागर I
तैसे प्राप्त करण्या परमेश्वर I उपासती तुज देवा II
आपापल्या समजुतीने I रुचिवैचित्र्ये, नानामार्गाने I
उपासनांच्या योगाने I भजती तुला दयाळा ..........II७II

हे वरदा, तुझा कुटुंबसंसार I खट्वांग, परशु, नंदीकेश्वर I
गजचर्म, व्याघ्रचर्म परिकर I चिताभस्म लेपिसी II
सर्प सर्वांगा रुळती I नर कपाळ गळा शोभती I
स्मशानी सर्वदा वसती I आत्मानंदी विराजसी II
परी तुझ्या सेवेने वा कृपेने I देव इच्छिले मिळविती जाणे I
समृद्ध करिसी इतरांस झणे I स्वत: राहसी दरिद्री II
याचे सांगतो कारण I जो सच्चिदानंदपरमस्वरूपी रमण I
त्यासी रुपरसरंगादिकाचे आकर्षण I कधीच मोहू शकेना .....II८II

कोणी म्हणती जग हे शाश्वत I कोणी म्हणती अशाश्वत I
जगी या दोन्ही प्रकार आहेत I तिसरे म्हणती शाश्वत, अशाश्वत II
ऐसे भिन्न भिन्न बोलती विद्वान I त्यायोगे आश्चर्यचकित होऊन I
तरीही तव स्तुती महान I जाणतो मी अंतरी II
हे त्रिपुरहरा, तुझे स्तवन I करण्या मी न लाजे एक क्षण I
कारण वाचाळता असते धारिष्ट्यवान I विशेषत्वे भासते ......II९II



श्लोक ४ ते ६
हे देवा वरदायका I जगाच्या उत्पत्तीकारका I
पालनाकर्ता ,संहारकर्ता I तूच अससी बा रे II
तूच आपुल्या रूपांतून I सत्व,रज,तम गुण निर्मून I
ब्रह्मा, विष्णू, महेश्वर स्थापूनी I चारी वेदही निर्मिले II
ऐसे तुझे महात्म्य असतां I मूढमती तुज दोष लाविता I
अद्न्यानी , दुर्दैवी जी जनता I ह्या कोलाहले वेडावते II
परंतु जे द्न्यानी तव भक्तजन I तयांसी नावडे एक क्षण I
तयांसी तव भजन किर्तन I गोड वाटे सर्वदा ..........II४II

वृथा कोलाहल करूनी मूढमती I परमेश्वर नाही जगी म्हणती I
जरी आहे म्हणता तरी प्रचीती I सांगा म्हणती आम्हांसी II
देव करी विश्व निर्माण I तर मग कोणत्या रूपानं I
कशाप्रकारे, कशापासून I आधारे उपायी कोणत्या II
आपण जर सांगू जात I की मातीपासूनी घडतो घट I
तर म्हणती विशेष काय त्यांत I मानवही जे करू शके II
जर का सांगता येईना उत्तर I तर मग नसेच परमेश्वर I
असले कुतर्क करूनी वारंवार I मोडू बघती जगताला II
परंतु तू असशी कल्पनातीत I तू घटना घडविसी अघटीत I
तव महात्म्यापुढे खचित I फोल ठरती कुतर्क हे ...........II५II

पहा कैसे फोल ठरती I हे सर्व अवयवयुक्त लोक असती I
ते कैसे जन्म पावती I कर्त्यावाचून जगती या II
बरे तो कर्ता ईश्वरावाचून I जर का दुसरा असेल कोण I
तर मग हे जग निर्माण I कशापासून केलेसे II
जो नसे स्वशरीररचना जाणत I तोही चतुर्दशभुवने रचीत I
हे तो शक्य नसे खचित I अशक्यही सर्वथा II
तेव्हा हे देववरा I जगताची उत्पत्ती-लयकारा I
तुझ्यावाचून परमेश्वरा I कोणी नसे जगती या II
ऐसे असूनही देवाधिदेवा I ज्यांनी तुजविषयी संशय धरावा I
IIत्यांच्या औषध नाही स्वभावा I ते खरेच मूढमती ........II६II
Posted by संदीप at 7:14 AM 0 comments
Thursday, July 16, 2009
श्लोक १ ते ३
II श्री II
II मराठी ओवीरूप महीम्नस्तोत्र II

श्री गणेशाय नम: I श्री पार्वती परमेश्वरायनम: II

देवा तुझे अनंत भक्त I त्यांतील महान पुष्पदंत I
त्याने स्तविले तुला संस्कॄतात I महीम्नस्तोत्र ख्यात जे II
गाईन म्हणते मी पण I मराठीत ते अनुवादुन I
परी अल्पमती मी तर जाण I तूच बुद्धी देईजे II
गंधर्व म्हणे हे शंकरा I हरण करिसी दु:खभारा I
यास्तव तुज हरा हरा I जय जय करिती सर्वदा II
तुझा अपार महिमा I न जाणता केले गायना I
तरी अयोग्य असे म्हणवेना I कारण अनभिद्न्य असे ब्रह्मही II
थोर थोर देव करिती स्तुती I परी कुंठित होई त्यांची मती I
तेही न जाणती तुझी महती I अपरंपार जी II
आपापल्या यथामतीने I केली तवस्तुती सर्वजने I
देवा, निर्दोष आहे हे स्तवणे I म्हणुन मीही स्तवू शके....... II१II

हे हरा , तुझा महिमा I वाणी मन यांसी अगम्या I
नेती नेती म्हणतची सुरम्या I स्तविती वेद बिचारे II
ऐशा देवा तुझी स्तुती I कोण करू शके जी जगती I
बहुविध गुणांनी तू नटसी I केवळ अवर्णनीय II
परंतु तू अनिर्वचनीय I निर्गुणरुपी असून I
भक्तानुग्रहास्तव सगुण रूप घेऊन I पार्वतीपरमेश्वर शोभसी II
वृषभवाहन जटाजूटधारी I त्रिशूळ डमरू शोभतो करी I
चंद्रकोर गंगा जटेवरी I व्याघ्रांबर वेष्टीलेसे II
ऐशा तर स्वरूपाकडे I पाहूनी मन, वाणी ज्याची न जडे I
ऐसा या त्रिभुवनी न सापडे I कोणी एक ............II२II

हे शिवा ब्रह्मरूपा I वाणी तव मधासम बापा I
अमृतासम वेदरूपा I प्रगटवसी उच्छ्वासे II
ऐशा तुझ्या वाणीपुढे I ब्रह्मा बृहस्पती गमती बापुडे I
तेथे म्या काय गावे पोवाडे I असाध्य आहे सर्वथा II
ऐसे असता त्रिपुरनाशका I तव गुणवर्णनी पुण्य जे कां I
त्या पुण्ये मम वाणी सर्वथा I पवित्र व्हावी वाटतसे II
याच एक इच्छेकरून I तुझी स्तोत्रे गाईन I
देई स्फूर्ती कृपा करून I देवा तूची शंकरा ...........II३II



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

विसरू नको रे आई बापाला

मराठा आणि ब्राह्मण वाद.....