satya sai katha
शंभराहून अधिक देशांत स्वत:चा आध्यात्मिक व आíथक पसारा असणाऱ्या सत्यसाईबाबांचे निधन झाले. अत्यंत सामान्य ग्रामीण कुटुंबातून आलेल्या. तेलुगू भाषाच बोलता येणाऱ्या आणि स्वत:च्या राज्याच्या सीमा क्वचितच ओलांडणाऱ्या बाबांच्या प्रभावाचा हा विस्तार थक्क करणारा आहे. हजारो खेडेगावांना िवधन-विहिरी, पंचतारांकित दर्जाच्या शिक्षण संस्था, त्याच तोडीची नि:शुल्क आरोग्य व्यवस्था देणारी इस्पितळे अशा अनेक सेवासुविधा सत्यसाईबाबांच्या ट्रस्टमार्फत पुरविण्यात येतात. त्यांची एकूण मालमत्ता ४० हजार कोटी ते एक लाख कोटी रुपये एवढी महाप्रचंड असल्याचे अंदाज आहेत. राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, झगमगते सितारे, सेलिब्रेटींचे सेलिब्रेटी मानले गेलेले क्रिकेटचे परमेश्वर अशा असंख्य लोकांचा समावेश सत्यसाईबाबांच्या भक्तगणांत आहे. गेल्या तीन-चार दशकांत सत्यसाईबाबांनी असंख्य वेळा आपल्या भक्तसमुदायासमोर चमत्कार केले. विभूती, रुद्राक्ष, सोन्याची अंगठी, चेन, भारी घडय़ाळे इत्यादी वस्तू त्यांच्या रिकाम्या हातात अवकाशाच्या अथांग पोकळीतून आपोआप येत होत्या. भाविकांना त्यांचा प्रसाद मिळत होता.
चमत्कार करण्याची शक्ती ही परमेश्वराने मला बहाल केलेले ‘व्हिजिटिंग कार्ड’ आहे असे ते सांगत. ‘मानवी उद्धारासाठी पाठवलेला महापुरुष तो हाच’ याची खूण जनसामान्यांना पटावी यासाठी जगन्नियंत्याने दैवीशक्तीचा आविष्कार घडवणारे हे चमत्कार करण्याची अद्भुत शक्ती त्यांना बहाल केली आहे, असा त्यांचा दावा होता. ते जाहीरपणे सांगत की, ‘माझ्या अमर्याद शक्तीचा केवळ मर्यादित बाह्य़ आविष्कार म्हणजे ‘चमत्कार’. अशा काही उच्च दर्जाच्या शक्ती आहेत की, त्यांच्या मार्फत तुम्ही आपल्या मनातून संकल्पाने वा शुभेच्छेने वस्तू निर्माण करू शकता. (माझ्यासारखा) जो मनुष्य ईश्वरीशक्तीनुसारच काम करतो त्याच्या बाबतीत या शक्ती संपुष्टात येण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्या मार्फत साक्षात ईश्वरीशक्तीच काम करीत असते. ज्याच्यापासून वेद निघाले त्या माझ्या आध्यात्मिक वैभवाच्या तुलनेत माझे चमत्कार हे प्रचंड हत्तीवर बसलेल्या चिलटाप्रमाणे आहेत.’ हे सर्व प्रतिपादन आजच्या वैज्ञानिक जगाचा मूलाधार असलेल्या कार्यकारणभावाला रद्दबातल ठरवणारे आहे. याबाबतचे ‘सत्य’ शोधले तर? परंतु याबाबतच्या शास्त्रीय तपासणीची सर्व आव्हाने सत्यसाईबाबांनी संपूर्ण दुर्लक्षित केली. म्हणूनच त्यांच्या दु:खद निधनाबाबत संपूर्ण सहवेदना दाखवूनही काही प्रश्न उपस्थित करणे आवश्यक वाटते. कृपया तो औचित्यभंग मानला जाऊ नये.
या देशातील बहुतेकांची मानसिकता ही चमत्कारशरण असते. सामान्यपणे असंभव, अशक्य, अतक्र्य वाटणाऱ्या घटनांस अगर कृतींस चमत्कार म्हटले जाते. चमत्कार करणाऱ्या व्यक्तीबद्दल लोकांच्या मनात प्रचंड आदर, पूज्यभाव आणि श्रेष्ठत्वाची भावना असते.बाबांच्या चमत्कारावरील विश्वास हा खरे तर प्रचितीचा भाग नसतो; तर श्रद्धेचा मामला असतो. ज्या बाबावर त्याच्या अनुयायांची श्रद्धा असते, त्याला स्वत:चे कल्याण बाबांच्या हातांत सुरक्षित आहे याबद्दल नि:शंकता असते. लहान मुलांची आपल्या आईवडिलांवर जशी श्रद्धा असते, तसाच हा प्रकार आहे. ज्ञानेंद्रियांपलीकडच्या सत्याचा – परतत्त्वाचा स्पर्श झालेल्या या महापुरुषांच्या खाणाखुणा कोणत्या? ही असामान्य माणसे दोन प्रकारे सामान्यांपेक्षा वेगळी असतात असे मानले जाते. एक तर त्यांच्याकडे दैवी सामथ्र्य असते, विज्ञानाचे नियम लागू नसल्याने ते चमत्कार करू शकतात. अशी व्यक्ती जे भविष्य वर्तवते, ते खरे ठरते. तिने उच्चारलेला शब्द आपोआप सत्य बनतो. अथवा दुसरे म्हणजे, अशा व्यक्ती पराकोटीच्या सद्वर्तनी, सद्गुणी, सज्जन असतात. त्यांचे जीवन हे वेगळ्या पातळीवरचे जीवन असते. तुकाराम, विनोबा, गाडगेबाबा ही या स्वरूपाची उदाहरणे आहेत. वरील दोन्ही स्वरूपांच्या खाणाखुणा शोधण्याचे अजब आकर्षण बहुतेकांना असते. त्या मानसिकतेतून तपासणीला तयार नसणाऱ्या, चिकित्सेला नकार देणाऱ्या श्रद्धेचा जन्म होतो. चमत्काराला बळी पडणारे हे मन एका मानसिक गुलामगिरीला जन्म देत असते. भारतीय समाजाची जडणघडण मुळातच दैववादावर आधारलेली आहे. कोणतीही लहानमोठी संकटे हे लोकांना नशिबाचे भोग वाटतात. दैवी शक्तीमुळे चमत्कार करणारा बाबा यातून आपली सुटका करील, अशी लोकांची (अंध)श्रद्धा असते.
सर्व चमत्कार सिद्धीमुळे शक्य होतात, पण त्या सिद्धींचा मोह टाळावा, त्या क्षुद्र आहेत असे साधुसंतांचे, धर्मपरंपरेचे मत आहे. ज्यांच्याजवळ निखळ नतिक धर्मभावना आहे, ते नेहमीच चमत्कार करण्याच्या विरोधात राहिले आहेत. जो माणूस चमत्कार करून शिष्य गोळा करतो त्याचा संतवाङ्मयात धिक्कार केला आहे. हातातून सोन्याच्या साखळ्या सहजपणे व अनेक वेळा निर्माण करणाऱ्या सत्यसाईबाबांची अद्भुत शक्ती खरी आहे, असे क्षणभर मानूया. मग स्वाभाविकच असा प्रश्न पडतो, की देशाचा कर्जबाजारीपणा हटवण्यासाठी आणि भारताला सुवर्णभूमीचे पूर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी काहीतरी करावे असे त्यांना कधीच कसे वाटले नाही? बंगलोर विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्येष्ठ गांधीवादी व शास्त्रज्ञ एच. नरसिंह राव यांनी सत्यसाईबाबांना काटेकोरपणे चमत्कार तपासण्याच्या केलेल्या तिन्ही विनंत्यांना साधी पोचही का देण्यात आली नाही? बाबांनी सोन्याची अंगठी देताच तीच मूठ मिटून तत्क्षणी त्यातून बाबांना रस गुल्ला देणाऱ्या सुप्रसिद्ध जादूगार पी. सी. सरकार यांना धक्के मारून बाहेर का काढण्यात आले? हातातून भक्तांना सोन्याची चेन पंतप्रधान नरसिंह रावांच्या उपस्थितीत देत असताना ती बाबांच्या हातात स्मृतिचिन्हाखालून भक्ताने कशी हस्तांतरित केली याचे स्वच्छ-स्पष्ट चित्रीकरण उपलब्ध असताना त्याबद्दल बाबांनी मौन का बाळगले? चमत्कार करणारे आणि तो भक्तिभावाने स्वीकारणारे हा एक सिद्ध-साधकांचा खेळ आहे. चमत्कार करणाऱ्या बाबाकडे लोक कशाला जातात? वासना आणि स्वार्थ सोडावयाचा असतो, उदात्त व पवित्र व्हावयाचे असते, म्हणून क्वचितच कोणी बाबाकडे जातात. त्यांपकी प्रत्येकाला काही ना काही आधार वा लाभ हवा असतो. आत्मा, परमात्मा, ब्रह्म, परब्रह्म, मोक्ष, मुक्ती, विश्वाचे नियंत्रण करणारी अलौकिक शक्ती आहे व ती अवतार घेते या सर्व कल्पना या देशातील बहुसंख्यांच्या मनात पक्क्या असतात. स्वाभाविकच चमत्कार करू शकणारा बाबा हा साक्षात् परमेश्वराचा अवतार आणि प्रारब्ध बदलू शकणारा तारणहार वाटतो. बाबा-बुवा यांच्या बुवाबाजीचे वाहक बनलेल्या चमत्कारांना विरोध केला की संतांनी केलेल्या चमत्कारांचा दाखला देण्यात येतो. शेकडो वर्षांपूर्वी ज्या बाबी घडून गेल्या असे सांगण्यात येते, ज्यांचा कसलाही पुरावा उपलब्ध नाही, त्यामुळे शास्त्रीय तपासही अशक्य आहे. अशा चमत्कारांबद्दल जणू काही ते सत्यच आहेत अशी अभिनिवेशाची भूमिका खरे तर घेतली जाऊ नये.
चमत्कारावर विश्वास ठेवणे आणि ते करणाऱ्या बाबांना मान्यता देणे यातील मुख्य तोटा हा की, अशी माणसे प्रयत्न आणि पुरुषार्थ यांवरचा स्वत:चा विश्वास गमावतात, इतरांनीही तो गमवावा असे वातावरण तयार करतात. चमत्कारांच्या बाबतीत ही पलायनवादी भूमिका अधिक ठळकपणे दिसते. चमत्कारांचे माहात्म्य वाढण्याचे अनेक तोटेच व्यक्तिगत व सामाजिक जीवनात दिसतात. अशा परिस्थितीत खरे तर चमत्काराची शास्त्रीय चाचणी देण्याची जबाबदारी तसा दावा करणाऱ्या बाबा-बुवांवर द्यावयास हवी. त्यामुळे घटनेत नागरिकाचे कर्तव्य सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजेच कार्यकारणभाव सोडून कोणताही चमत्कार घडत नाही, याची प्रचीती मिळेल. माणसाचे सर्वात प्रभावी हत्यार म्हणजे त्याची बुद्धी. ‘बुद्धीने तपासेन आणि सिद्ध होईल तेच मानेन’ हीच शास्त्रीय दृष्टिकोनाची प्रतिज्ञा असते. ती विसरल्याशिवाय चमत्कारावर विश्वास ठेवताच येत नाही. आपल्या इच्छांच्या पूर्ततेसाठी, ‘अज्ञाताचे दर्शन कोणामार्फत तरी चमत्काराच्या दैवी सामर्थ्यांने होते असे मानून त्याच्यापुढे नतमस्तक होणे ही गोष्ट माणूस नक्कीच टाळू शकतो. वैज्ञानिक दृष्टिकोन शैक्षणिक धोरणातील महत्त्वाचा गाभा, घटक आहे, महत्त्वाचा म्हणून मूल्यशिक्षणात समाविष्ट आहे, तो किती थेटपणे चमत्काराच्या विरोधात उभा आहे हे विद्यार्थ्यांना समजावले जात नाही. संस्कारित करणे तर दूरच राहिले. चमत्कारांना सत्य मानणे आणि कोणतीही शंका उपस्थित न करता चमत्कारांना शरण जाणे ही मानसिक गुलामगिरीची सुरुवात असते. बाबांनी दिलेल्या चिमूटभर अंगाऱ्याने स्वत:च्या सर्व अडचणी दूर होतील व सर्व मनोकामना पूर्ण होतील अशी (अंध)श्रद्धा ती विभूती लाभलेला भाविक बाळगतो. ज्या चमत्कारामुळे बाबा अंगारा निर्माण करतो त्यामुळेच कार्यकारणभाव मोडीत काढणारे दैवी सामथ्र्य त्याला प्राप्त होते. हे कसे शक्य आहे, हा प्रश्न विचारणे पाखंडाचे लक्षण ठरते. त्यामुळे संबंधित संतप्त होतात. याचे कारण चमत्काराच्या प्रभावाने निर्माण झालेली मानसिक गुलामगिरी माणसाची बुद्धी दुबळी, पांगळी आणि आंधळी करते. माणसाचे व्यक्तिमत्त्व मोडून पडते. बाबा, बुवा, स्वामी, महाराज यांच्या कथित अलौकिक शक्तीच्या हातांत स्वत:ला सोपवून व्यक्ती मोकळी होते.
चमत्काराचा वादग्रस्त मुद्दा उभा करून बाबांच्या अफाट सेवाकार्याकडे दुर्लक्ष केले जाते असा एक आक्षेप असतो. बाबांनी शाळा, दवाखाने वगरे गोष्टी उभ्या केल्या हे खरेच आहे, चांगलेही आहे. पण या स्वरूपाची असंख्य काय्रे याहीपेक्षा फार मोठय़ा प्रमाणावर कोणतेही राज्य शासन वा केंद्र शासन करतच असते. त्याचे कौतुक नसते, कारण लोकांच्या करातून मिळालेल्या पशांतूनच हे सारे घडवले जाते. अब्जावधी रुपयांचा अखंड ओघ येत असेल तर काही सेवाकाय्रे त्यातून उभी राहणारच. असंख्य सेवाकाय्रे करणाऱ्या सरकारला सामान्य नागरिक प्रश्न विचारतो, चिकित्सा करतो, पाच वर्षांनी पदच्युतही करू शकतो. तो त्याचा अधिकार मानला जातो. बाबांच्या ट्रस्टला अफाट देणग्या मिळण्यात त्यांच्या चमत्काराचा नि:संशय वाटा आहे. मग त्या चमत्कारांना प्रश्न विचारणे, त्यांची चिकित्सा करणे यामुळे बाबांचा अधिक्षेप का मानला जातो? कोणतेही बाबा कितीही ‘सत्य’ असले तरी व्यवस्थापरिवर्तनाबद्दल चकार शब्द काढत नाहीत. माणसाला माणसाशी प्रेमस्वरूप जोडणे हे चांगलेच आहे, पण येथील जातिव्यवस्था, विषमतेची दरी, भ्रष्टाचार, भ्रूणहत्या, क्षणाक्षणाला हे प्रेमस्वरूप उद्ध्वस्त करत असते. त्याच्याबद्दल फक्त मौनच कसे बाळगले जाते? त्यातच भक्ताचे परमकल्याण असल्याचा पुकारा असतो. बाबाचा प्रत्येक शब्द हेच ब्रह्मवाक्य व नतिकता असते. स्वत:च्या चरणी रुजू होणाऱ्याचे सर्व कल्याण करण्याची ग्वाही दिलेली असते. अट फक्त एकच असते, बुद्धी वापरायची नाही. त्यामुळेच विज्ञान-तंत्रज्ञान विभागाचे केंद्रीय मंत्री शिवराज पाटील बाबांचे चमत्कार अद्भुत दैवीशक्तीचा आविष्कार म्हणून पाहू शकतात. स्वत:च्या मर्यादेत माणुसकीच्या आधारे प्रामाणिकपणे व धर्याने जगणे यातच माणसाची प्रतिष्ठा आहे. स्वत: चमत्काराच्या भूलभुलयापासून दूर राहणे, इतरांना मानसिक गुलामगिरीपासून दूर ठेवणे यातच जीवनाची सार्थकता आहे. ती ओळखावयास हवी, जोपासावयास हवी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा