dew chamatkar ......ani mi


देव ह्या संकल्पनेवर अनेकवेळा चर्चा होते व होत राहील, विज्ञाननिष्ठ व्यक्ती देव नसल्याचा पुरजोर दावा करेल व जो देव मानतो तो देव असल्याचा खात्रीलायक दावा करेल, येथे मीमराठीवर देखील अधून मधून ही चर्चा चालूच असते कधी धाग्यावर कधी खरडफळ्यावर तर कधी कट्टावर. देवाचे अस्तित्व नाकारावे की नाही हा ज्याच्या त्याच्या बुध्दीचा प्रश्न. विज्ञान देव ही संकल्पना मान्य करत नाही व प्रत्येक गोष्टीला एक कारक आहे , कारण आहे असे शास्त्र शुध्द नियमाद्वारे दाखवून देतो. अनिंस सारख्या संस्था व अनेक विज्ञान निष्ठ व्यक्ती मुळापासून देवाचे अस्तित्व मान्य करतच नाहीत पण हजारो वर्षापासून हिंदू मनावर देवाचे अस्तित्व वेगवेगळ्या कथेतून, ग्रंथातून, काव्यातून, अभंगातून बिंबवले जात आहे व त्यामुळे देवाचे अस्तित्व मान्य करणार्‍यांची संख्या ही जास्त दिसते, त्यामुळे हा वाद नेहमीच रंगतो.

दैवी चमत्कार मान्य करणे न करणे विज्ञाननिष्ठ व्यक्तीला सोपं जाते कारण त्याची मुळापासून आपल्या विज्ञानावर श्रध्दा असते व आपले मत बरोबर आहे ह्यासाठी विज्ञाननिष्ठ पुरावा ही त्याच्याकडे असतो ( जसे नाईल ह्यांनी विहीरी बाबत गणित मांडले आहे तसे) व प्रत्येक वेळी ते पुरावे सामान्य व्यक्तीला देखील पटतात. सामान्य व्यक्तीला आपल्या पुरातन संस्कृतीतून बाहेर पडण्यासाठी, पुरातन कथांना, चमत्कारांना, पुराण पुरुषाच्या अस्तित्वाला, देवाला नाकारणे जवळ जवळ अशक्य होऊन बसलेले असते कारण संस्कार, लोक-शिक्षणाची कमतरता.

मी स्वतः चमत्कार मान्य करतो पण तो विज्ञाननिष्ठ चमत्कार ! बाकी कुठला ही चमत्कार मी मान्य करु शकत नाही ह्यांचे कारण शक्यतो माझ्या वाचनामध्ये असेल किंवा जेव्हापासून डिस्कव्हरी व नॅशनल जीओग्रॉफिक टाईपची सर्वांग सुंदर दुरचित्रवाण्या आल्या त्यामुळे असेल. ह्यांनी दृष्टी दिली एखाद्या चमत्काराकडे कसे पहावे ह्याची. मी देवाचे अस्तित्व नाकारतो असे देखील नाही आहे कारण शेवटी मी देखील त्याच मातीतून आलो आहे जेथे लहानपणापासून देव सदैव आपल्याला पाहात आहे आपले कर्म पहात आहे असे शिकवले जाते. पण तरी ही काही गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर तोलून नक्की पहाव्या असे वाटतं.

कित्येक पिढ्यामागे माहीत नाही पण आमच्या घरातील एका व्यक्तीला आपला मुळ धर्म सोडून जैन धर्मात प्रवेश करावे असे वाटले असेल व त्यांनी त्यानूसार केला. पण मुळ धर्मातील देव हे ते देखील त्याग करु शकले नाहीत त्यामुळे नवीन धर्मात आल्यावर जसे नवीन देव देव्हार्‍यात आले तसेच जुने देव देखील तेथेच राहीले त्यामुळे आमच्या घरात लक्ष्मीपुजन होते, गणपती पुजन होते, कुल दैवत नाईकबाचे पुजन होते व त्याच बरोबर २४ तिर्थंकरांचे देखील पुजन मनन होते. त्यामुळे लहानपणापासून देव ह्या संकल्पनेवर प्रचंड विश्वासाचे वातावरण आमच्या घरात दिसे. देव व देवाचे मंदिर ह्या विषयी मला काय वाटते दे मी मागे एका लेखामध्ये लिहले आहे पण येथे देवाचेच अस्तित्व नाकारणारे वातावरण पाहीले की माझ्यासारखा माणूस बावरुन जातो. कोणाला बरोबर मानावे, कोणाचे सत्य सत्य म्हणून अंगिकारावे ह्या गोंधळात तो गप्प राहणेच पसंद करतो.

चमत्काराचा व माझा सरळ संबध आला तो जेव्हा मी बाहुबली हॉस्टेलमध्ये शिक्षण घेत असताना नेहमी दंगा व हॉस्टेलमधून पळून जाते असे प्रकार करत असे तेव्हा. कोणीतरी आईला सांगितले की ह्याच्यावर (माझ्यावर) कोणीतरी करणी केली असू शकते मग लगेच आमच्या माता आम्हाला कोल्हापुर पासून १३०-१४० किमी दुरवर कर्नाटकात एकोंडी नावाच्या गावी घेऊन गेल्या. बुवामहाराजांनी मला एका पुजेचे ठिकाण असलेल्या पाटावर बसवले व आपले मंत्र पठण चालू केले काही मिनिटानंतर डोक्यावर टपा टपा लिंबू पडू लागले चांगले वीस तीस लिंबू खाली पडले. अंगारा फुंकणे, चित्रविचित्र आवाज काढत गोल गोल फिरणे वर करुन लिंबू पाडणे हे काही वेळ चालू राहीले व आई कडून ५०१ रु. दक्षिणा घेऊन माझ्या डोक्यावरचे भुत उतरले आहे असे सांगून बोळवणी केली. त्या एरियातून बाहेर पडल्या पडल्या मी आईला प्रश्न विचारला ते महाराज मला बाहेर अंगणात बसवून ते लिंबू पाडून दाखवतील का ? झाले देवाबद्दल काय वाटेल ते विचारतोस म्हणून धप्पा धप्पा मार पडला रस्त्यावरच. माझी आई कमी शिकलेली आहे त्यामुळे मी त्या चमत्कारावर शंका व्यक्त करतो आहे म्हणजे मी त्याचे अस्तित्वच नाकारत आहे असे तिला वाटले. ( त्यानंतर देखील मी हॉस्टेलमधून अनेकवेळा पळून गेलो ही गोष्ट निराळीच ;) )

ह्यानंतरचा चमत्कार आमच्या पाहुण्यामध्येच एक स्त्री करत असे. पाटावर जोंधळे पसरवून त्यावर भरलेली पाण्याची तांब्याची घागर ठेवत असे समोर ती बसत असे व विरुध्द बाजूला ज्याला काही अडचण आहे ती व्यक्ती. मनातल्या मनात प्रश्न विचारायचे व त्या घागरी च्या काठांना दोन्ही हाताच्या मधल्या बोटाने फक्त स्पर्श करायचा व तिकडून तीने देखील तश्याच पध्दतीने स्पर्श करायचा उत्तर हो असेल तर घागर उजव्याबाजूला फिरु लागे व नाही असेल तर डाव्या बाजूला. मला ते पाहून एकदम तिच्यामध्ये असलेल्या शक्तीबद्दल तिच्या कार्याबद्दल व तिच्या अंगात येण्याबद्दल प्रचंड विश्वास वाटू लागला व काहीतरी दैवी शक्ती आहे ह्यामध्ये नक्की ह्या निर्णयापर्यंत आलो. असे काही दिवस भारावलेल्या अवस्थेत मी चांगल्या मुलासारखा वागलो तर घरी देखील तिच्याबद्दल विश्वास निर्माण झाला मग दर रवीवारी त्या पाहुणीकडे आमच्या फेर्‍या वाढल्या. घर पाहुण्याचेच असल्यामु़ळे मला व माझ्या बहिणीला प्रचंड मोकळीक होतीच. आम्ही खेळता खेळता त्या पुजाघरात शिरलो तर समोर ती घागर व साहित्य तयार होते अंगात मस्ती फार त्यामुळे लगेच समोर जबरदस्तीने बहिणीला बसवले व तिला त्या घागरीला स्पर्श करण्यास सांगितले व मी देखील केला काय नवल ती घागर माझ्यासारख्याच्या स्पर्शाने देखील उजवीकडे फिरली, मी बहिणीला हात त्या घागरीवरुन काढून पुन्हा स्पर्श करायला लावला पण आधी उजवे बोट स्पर्श कर असे सांगितले मग परत घाघर फिरली डाव्याबाजूला. हे पाहून माझी बहिणीची तंतरी उडली व ती तेथेच किंचाळली घागर फिरत आहे बघून. झाले परत मार पडला पण मला कळाले ही काहीही असो चमत्कार नक्कीच नाही आहे ह्यामागे. घरी आल्यावर आईला पटवून देण्याचा खुप प्रयत्न केला घरीच तसा सेटअप करुन तीला घागर फिरवून दाखवली तरी तीने ते मान्य केले नाही की तो चमत्कार नव्हता.

ही झाली दोन उदाहरणे भोंदुबाजीची म्हणा अथवा चमत्काराची कारण दोन्ही जागी लोकांच्या प्रचंड रांगा लागायच्या संकट निवारण्यासाठी. चांगल्या गोष्टीचा प्रसार होण्यासाठी वर्षानू वर्ष लागतात पण एखादा चमत्कार काही तासामध्ये जगभर पसरु शकतो, आपल्यापैकी जवळ जवळ सर्वांना "गणपती दुध पितो" चा पराक्रम माहीत असेल ना ! त्या दिवशी आमच्या घरातील डाव्या सोंडेचा सोनेरी गणपती देखील चमच्याने दुध पित होता व वाड्यात आमच्याच घरी गणपतीची मुर्ती असल्यामुळे घरी प्रचंड गर्दी व बाहेर रांगा लागल्या होत्या ते अजून आठवते ;)

असे अनेक चमत्कार करणारे पाहणे माझ्या नशीबी आले पण परवा परवा जेव्हा अपघात झाला म्हणून घरी आडवा पडलो होतो तेव्हा आईला कोणी तरी माझी दृष्ट काढावयास सांगितली, अर्धातास लेक्चर दिले पण आई काय बधली नाही व शेवटी मी हार मान्य करुन तीला तिचे कार्य करु दिले. दहा-बारा वाळलेल्या लाल मिर्च्या तीने माझ्यावर उतरवून चुलीत टाकल्या व चार पाच मिनिटाने माझ्याकडे आली व म्हणाली बघ.. आता तरी समजले का ? मला काहीच समजले नाही तेव्हा तीने मला सांगितले की तु एक लाल मीर्ची चुलीत टाकून बघ. काही न करता उचलायची व चुलीत टाकायची. माझे विज्ञान निष्ठ मन ह्यासाठी लगेच तयार झाले व म्हणालो बघ ह्या मिर्चीचा पण धुर होणार नाही म्हणून समोर असलेल्या पोत्यात हात घालून एक मिर्ची उचलली व सरळ स्वंयपाक घरातील चुलीत टाकली.......दहा मिनिटे खोकुन खोकुन जीव अर्धमेला झाला..

आईच्या डोळयात विजयी भाव होते व माझ्या मनात हे असे कसे झाले असावे ह्याचा विचार. त्याच पोत्यातील बागडी मिर्च्या ( कर्नाटकातील एक लाल मिर्चीचा प्रकार जो प्रचंड तिखट असतो व जहाल देखील) आईने माझ्यासमोर घेतल्या होत्या व चुलीतल्या निखार्‍यावर टाकल्या होता तेव्हा धुर न होता मिर्च्या जळून गेल्या पण त्याच पोत्यातील मिर्ची मी जेव्हा निखार्‍यावर नुस्तीच टाकली तेव्हा मात्र ती मिर्ची जळून न जाता घरात मिर्चीचा धुर करुन गेली असे का घडले असावे ? ह्याचे उत्तर मला काही सापडले नाही, आमच्या स्वयंपाक घरातून त्यानंतरचे चारपाच दिवस मिर्च्याचा धुर येतच असे.. कारण माझे समाधान झाले नव्हते पण प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मी मिर्ची टाकत असे तेव्हा धूर होत असे हे नक्की. शेवटी माझी मावस बहिणी आपल्या बाळाला घेऊन मला बघायला आली होती ते बाळ प्रचंड रडत होते म्हणुन आईने परत तोच प्रयोग त्या बाळावर केला तेव्हा मात्र धुर झाला नाही त्यामुळे डोके जाम सटकले विश्वास ठेवू नये असे नक्की माझे मन सांगत होते पण जे डोळ्यासमोर घडले त्याला काय म्हणावे ! ह्याला मी चमत्कार नक्कीच म्हणणार नाही पण कुठेतरी काहीतरी नक्की ह्यामागे कारण असेल हे मात्र खरं.

जाता जाता....

आग्र्याला ताजमहल आहे जगप्रसिध्द, वास्तू शास्त्रातील चमत्कार असे पण म्हणतात काही जण पण त्याचे मला कधीच आकर्षण वाटले नाही पण तेच जयपुर मध्ये हवा महल आहे तो मला नक्कीच चमत्कार वाटतो भर उन्हाळ्यात बाहेर ४०-४२ अंश उष्णता रखरखत असते व हवामहल मधील प्रत्येक खोली एसी लावल्याप्रमाणे थंडगार असते... चमत्कार म्हणावा तर ह्याला !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

मराठा आणि ब्राह्मण वाद.....

shivaji महाराज.......