swatantra shod
ते नावं बदलताहेत
शहरांची घरांची विद्यापीठांची विमानतळांची
ही लागण वाढत जाईल
ते बदलतील नावं शब्दांची
भुकेला अन्न, तहानेला पाणी म्हणतील
माणसांना ग्राहक, मॉलला मंदिर-मस्जीद म्हणतील
घराला वेटींगरुम, पोराला इन्व्हेस्टमेंट म्हणतील
आत्महत्येला मुक्ती, वनवासाला संन्यास म्हणतील
गांधीला गोडसे, शिवीला ओवी, पुस्तकाला बॉम्ब म्हणतील
चला, आपणही त्यांच्या आरत्या ओवाळू
त्यांची पूजा करू, त्यांना साष्टांग नमस्कार घालू
आधी या शब्दांची नावं जरा आपणही बदलून घेऊ
-
शहरांची घरांची विद्यापीठांची विमानतळांची
ही लागण वाढत जाईल
ते बदलतील नावं शब्दांची
भुकेला अन्न, तहानेला पाणी म्हणतील
माणसांना ग्राहक, मॉलला मंदिर-मस्जीद म्हणतील
घराला वेटींगरुम, पोराला इन्व्हेस्टमेंट म्हणतील
आत्महत्येला मुक्ती, वनवासाला संन्यास म्हणतील
गांधीला गोडसे, शिवीला ओवी, पुस्तकाला बॉम्ब म्हणतील
चला, आपणही त्यांच्या आरत्या ओवाळू
त्यांची पूजा करू, त्यांना साष्टांग नमस्कार घालू
आधी या शब्दांची नावं जरा आपणही बदलून घेऊ
-
Shawshank Redemption (सोयीसाठी इथून पुढे SR असं लिहीतो) ची कथा सुरू होते एका कोर्टकेस पासून - अॅन्डी डुफ्रेन्स हा बॅंकर आहे व त्याच्यावर स्वत:च्या व्यभिचारी बायकोच्या खून केल्याचा आरोप आहे. निर्दोष असूनही प्राप्त साक्षीपुराव्यानुसार अॅन्डीला दोषी ठरवण्यात येतं आणि अॅन्डीची रवानगी होते Shawshank या तुरूंगात. चित्रपटातील पुढील भागाचं थोडक्यात वर्णन सोपं आहे - अॅन्डीचं तुरूंगातील आयुष्य आणि सरतेशेवटी पळून जाऊन तुरंगातून करून घेतलेली सुटका.
Shawshank redemption या चित्रपटाबद्दल लिहायचं ठरवलं की विचाराची चक्रं सुरू होतात, कुठुन सुरू करावं कळत नाही. मग मी थोडा वेळ तोच चित्रपट पाहतो आणि लिहायचं राहूनच जातं. या वेळी मात्र ठरवून लिहायला बसलो आहे.
आत्तापर्यंत जे काही fiction पाहिलंय/वाचलंय (यात कथा/कादंबरी/नाटक/चित्रपट सर्वच आलं) त्यावरून चांगल्या fiction बद्दल माझी काही निरीक्षणं आहेत. अशा कलाकृतीमधली कथा उत्तम असते. आणि अशी कलाकृती त्या कथेपलीकडच्या मानवी मूल्यांच्या बाबतीत, मानवी नातेसंबंधाच्या बाबतीत, समाजव्यवस्थेच्या बाबतीत, शाश्वत सत्याच्या बाबतीत सूक्ष्मपणे भाष्य करत असते. हे भाष्य समर्पक असतं, प्रामाणिक असतं. ते भाष्य अतिरंजित, बटबटीत किंवा अप्रामाणिक झालं की त्या कलाकृतीचा तोल ढळतो आणि ती कलाकृती चांगल्या fiction पासून दूर जाते.
SR चित्रपटाचा गाभा स्वातंत्र्य हे मूल्य आहे. SR ही एका व्यक्तीची स्वातंत्र्य या तत्त्वासाठी दिलेल्या लढ्याची कथा आहे. स्वातंत्र्य या शब्दाबद्दल मला कायमच संभ्रम राहिलेला आहे. 15 ऑगस्ट 1947 ला ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून भारताला स्वातंत्र्य मिळाले या ओळीचा अर्थ समजून घेण्यासाठी खूप जास्त अभ्यासाची गरज आहे. कारण स्वातंत्र्य नव्हते म्हणजे काय नव्हते? ते मिळाले म्हणजे नेमके काय मिळाले?
आजच्या संदर्भात स्वातंत्र्याचा अर्थ (हक्क आणि जबाबदाऱ्या) यावर मला संपूर्ण स्पष्टता नाही. आपण लोकशाही व्यवस्थेचे घटक आहोत. आपल्यावतीने आपण काही जबाबदाऱ्या शासनातील काही घटकांना देतो. त्या जबाबदाऱ्यांच्या बाबतीत बहुतांश वेळेस आपण त्या व्यवस्थांचे म्हणणे मान्य करतो. म्हणजे आज मी स्वतंत्र आहे पण मी मला वाटेल त्या गोष्टी करू शकत नाही. केल्यास मला दंड करण्यासाठी पोलीस/न्याययंत्रणा अस्तित्त्वात आहे. स्वातंत्र्य हे अमर्याद स्वातंत्र्य किंवा स्वैराचार होऊ शकत नाही. मग ही स्वतंत्रतेची सीमा नक्की कुठे आखणार? आणि शासनव्यवस्था जर चुकीच्या वागल्या तर माझं त्याला उत्तर काय असणार?
आपला समाज, त्यातल्या सिस्टीम्स या शेवटी आकाशातून अवतीर्ण झालेल्या सिस्टीम्स नाहीत. त्या आपण समाज म्हणून घडवत आणलेल्या सिस्टिम्स आहेत ही जाणीव फार जणांना नसते. ही सिस्टीम किंवा व्यवस्था चुका करू शकते. ही जाणीव दुर्दैवाने फार व्यापक नाही. बहुतांश लोक सिस्टिम्सला अंतिम मानून चालत असतात. एखादे टिळक, गांधीजी, सावरकर, थोरो यांना याची जाणीव असते. म्हणूनच टिळकांना ब्रिटीशांची सत्ता ही काही अंतिम निसर्गत:च आलेली सत्ता नाही हे समजते व ते त्याविरुद्ध आवाज उठवतात. टिळकांचे मंडालेच्या शिक्षेच्या वेळी काढलेले “न्यायालयाच्या वर एक न्यायालय असून त्यावर आपला विश्वास आहे” हे बोल किंवा थोरोचे थोडे उपहासिक अर्थाचे “Any fool can make a law, and any fool will mind it” हे शासनव्यवस्थेला उद्देशून काढलेले बोल याचीच साक्ष देतात. ही जाण तुकाराम, विजय तेंडुलकर, अल्बेर काम्यु सारख्या साहित्यिकांना असते. त्यामुळेच तुकाराम “सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता” असे लिहू शकतो. आजच्या काळात मेधा पाटकर, अरूणा रॉय, बाबा आमटे यासारख्या लोकांना ही जाणीव असते. सिस्टीम्स या आपणच घडवलेल्या आहेत व त्या अंतिम अधिकारी असू शकत नाहीत ही जाणीव राज्यकर्त्यांना नेहमीच त्रस्त करत आली आहे. राज्यकर्ते किंवा हातात सत्ता असणारे लोक ही जाणीव नेहमीच दडपण्याचा प्रत्यत्न करतात.
तुरूंगात टाकलेली व्यक्तीच्या अगदी साध्या साध्या वागण्यावर बंधने असतात. तुरूंगात असलेल्या कैद्यांची स्वातंत्र्याप्रती असणारी तीव्र ओढ आणि ती ओढ जागृत ठेवणारा अॅन्डी SR मध्ये सुरेख चित्रीत झाला आहे. त्यामुळे त्याच्या मनातल्या स्वातंत्र्याच्या इच्छेला (तो दोषी नसल्यामुळे) अपराधीपणाच्या भावनेचा स्पर्श झालेला नाही. स्वत:च्या मनातल्या दुर्दम्य आशावाद अॅन्डी पुन्हापुन्हा दाखवतो – मग ते स्वत: जोखीम घेऊन सह-कैद्यांना कॅप्टनच्याच खर्चाने तुरूंगातल्या गच्चीवर बीअरची पार्टी देणे असो, स्वत:ला शिक्षा होईल हे माहीत असतानासुद्धा तुरूंगातील लाऊडस्पीकरवर संगीत लावणे असो किंवा तुरूंगाचा वॉर्डन ज्यावेळी आपले रास्त म्हणणे नाकारतो त्यावेळी अॅन्डीने वॉर्डनला करून दिलेली त्याच्या मूर्खपणाची जाणीव असो, अॅन्डी स्वत:मध्ये आणि आपल्या सह-कैद्यांमधे ही स्वातंत्र्याची जाणीव कायम जागती राहील अशा कृती करतो.
चित्रपटात अॅन्डी आपल्याला एक साधा माणूस म्हणून दिसतो – जो तुमच्यामाझ्यासारखाच आहे. तो अतर्क्य साहसी कृत्ये करू शकतो म्हणून तो चित्रपटाचा नायक नाही, तो अतिशय देखणा आहे व त्याच्यावर नायिका फिदा आहे म्हणून तो चित्रपटाचा नायक नाही, त्याला नायक काय बनवतो तर त्याचा तत्वासाठीचा लढा. SRमधील अॅन्डीची स्वातंत्र्याची जाण आणि त्याचा लढा हा वर उल्लेखलेल्या लोकांच्या क्वालिटीचा आहे. देशप्रेम वगैरे लेबल्स लागले नाही म्हणून अॅन्डीची जाण कमी प्रतीची ठरत नाही. सुटकेसाठीचे दीर्घकालीन प्रयत्न करताना सुटका नक्की होणार का ते माहीत नाही, तुरूंगातून सुटताना कदाचित पुन्हा पकडले जाऊ ही शक्यता आहेच. तरीही कुठला विचार आणि श्रद्धा त्याला सलग 20 वर्षांपर्यंत सुटकेसाठी प्रयत्न करण्यास उद्युक्त करतो? याची उत्तरे सोपी नाहीत आणि अॅन्डीच्या कथेत ती fictional आहेत म्हणून आपल्याला टाळता येणार नाहीत. कारण वर उल्लेखलेल्या व्यक्तींच्या रुपात अशी माणसे आपल्यात होऊन गेलेली आहेत किंवा अस्तित्वात आहेत. अन्यायाविरूद्ध तत्त्वांसाठीची अहिंसक परंतु निश्चयपूर्वक, सातत्यपूर्वक लढा असे अॅन्डीच्या सुटकेचे खरे स्वरूप आहे.
हा झाला स्वातंत्र्याच्या जाणीवेचा भाग. SR ने अजून एका बाबतीत खूप भारी दृष्टीकोन दिला, तो म्हणजेinstitutionalization ही संकल्पना. एका बाजूला स्वातंत्र्याची तीव्र ओढ दाखवतानाच दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्याची भीतीही हा चित्रपट दाखवतो. एखाद्या बंधनात एखादी व्यक्ती खूपकाळ राहिली तर तर ती व्यक्ती त्या बंधनाला institutionalize होऊन जाते. ते बंधन बरेवाईट कसेही असो त्या व्यक्तीला बंधनातून मुक्ततेची भीती वाटू लागते. बहुतांश काळ त्या बंधनात राहिल्यामुळे आयुष्य हे बंधनाला सरावलेले असते. पुन्हा ते सोडून नवा डाव मांडणे हे त्या व्यक्तीला अवघड जाऊ लागते. अॅन्डी आणि त्याचे सह-कैदी यातील फरक इथे दिसून येतो. एखाद्या बंधनाला institutionalize न होण्यासाठी काय करावे लागते? अॅन्डी ज्याप्रमाणे सतत क्रियाशील आणि आशावादी राहतो ते याला उत्तर असू शकेल काय?
कथा, दिग्दर्शन, पार्श्वसंगीत, अभिनय, संवाद या बाबतीत SR उत्कृष्ट आहे. अॅन्डीचा आणि आत्तापर्यंत उल्लेख न केलेला रेड हा अॅन्डीचा मित्र यांचा अभिनय खूपच सुंदर आहे. त्या दोघांमधले काही संवाद हे कित्येकदा पाहूनही माझ्यासाठी शिळे झालेले नाहीत. SR ने वर मांडलेले विचार व प्रश्न माझ्यापुढे उपस्थित केले म्हणून मला तो एक उत्कृष्ट चित्रपट वाटतो.
nice very nice virulkar
उत्तर द्याहटवा