sampurna slok kawita



श्लोक ४० ते ४३....

ऐशा प्रकारे वांग्मयरुपानं I श्रीमत्शंकर पुजून I
चरणकमळी सेवा केली अर्पून I तो संतुष्ट होवो मजवरी ...II४०II

हे महेश्वरा तुझे रुप जाणत नसे मी नित्य खास I
जैसा अससि तु तैशास I नमस्कारीतो सर्वथा.....II४१II

जो मनुष्य हे स्तोत्र एकदा I अथवा पठण करी दोनदा I
किंवा त्रिकाळ पढितो सर्वदा I शिवलोकी होई आदरिता ....II४२II

ऐसे हे पुष्पदंतोत्पन्न स्तोत्र I पापनाश करी सर्वत्र I
पठण करिता अहोरात्र I प्रसन्न होतो महेश्वर ....II४३II

इतिश्री पुष्पदंतविरचितं श्रीशिवमहिम्नस्तोत्रं संपूर्णम II
श्रीसांबशिवार्पणमस्तु, श्रीरस्तु, शुभंभवतु II
II ॐ नम: शिवाय II


श्लोक ३७ ते ३९

चंद्रमौळी देवाधिदेवांचा सेवक I पुष्पदंत नामे गंधर्व एक I
शंकररोषे झाला अघिकारभ्रष्ट I तेणे हे स्तोत्र गाईले .....II३७II

देव, मुनी यांना मान्य झालेले I स्वर्गमोक्षाचे साधन बनलेले I
ऐसे हे पुष्पदंताने स्तोत्र रचिले I अमोघ आहे सर्वथा II
जर कां मनुष्ये एकाग्रचित्ते I हात जोडूनी पठिले याते I
होतील त्याते किन्नर स्तविते I समीप जाईल शिवाच्या ...II३८II

पुष्पदंताचे मुखांतुन I स्तोत्र होऊन उत्पन्न I
सर्वदा करी पापनाशन I प्रिय असे सदाशिवा II
कंठस्थ करूनी लक्षपुर्वक I पठण करिता दिवसरात I
संतुष्ट होतो भूतनाथ I अंतर्बाह्य संरक्षी तो ........II३९II


श्लोक ३४ ते ३६

हे शंकराचे पवित्र स्तोत्र I पठण करिती परमभक्त I
ठेवुनी अतिशय शुद्ध चित्त I ते शिवरूप पावती II
धनवान होती इहलोकी I आयुष्मान होऊनी किर्ती पावती I
पुत्रवान होऊनी किर्ती पावती I समाधानी राहती सर्वदा ....II३४II

महेश्वरासम देव नाही I महिम्नस्तोत्रासम स्तुती नाही I
’अघोरेम्यो’ मंत्रासम मंत्र नाही I गुरूहूनी श्रेष्ठ तत्व नाही ....II३५II

मंत्र, दीक्षा, दान तपश्चर्या I तीर्थे ज्ञान यज्ञक्रिया I
महिम्नस्तोत्री यास तुलाया I सोळावी कलाही जड होई .....II३६II

S

श्लोक ३१ ते ३३

हे वरदा, कोठे अपरिपक्व माझे मन I कोठे तुझे नित्यसमृद्ध असंख्य गुण I
परि भक्तिने धरुनी तव चरण I वाक्पुष्पांजली समर्पिते .....II३१II

हे इश्वरा, सागराचे पात्र घेऊनि I पर्वतांची शाई त्यात कालवूनी I
कल्पवृक्षाची लेखणी करुनी I सर्वकाल लिहिते शारदा II
अक्षय लिहिते तुझे गुण I पृथ्वी संपूर्ण जाई संपून I
एवढे तव असंख्य गुण I तेथे म्या काय तुला वर्णावे ....II३२II

देव दानवे, मुनीवरे पुजिलेला I मस्तकी चंद्र धरिलेला I
गुणमहात्म्ये वर्णिलेला I ऐसा निर्गुण तु ईश्वरा II
देवा तुझे हे सुंदर स्तोत्र I मुख्य गंधर्व जो पुष्पदंत I
गाईले त्याने रचूनी वृत्त I तेच मीही गातसे ........II३३II

श्लोक २८ ते ३०

हे देवा, भव, शर्व, रुद्र सह महान I पशुपती, उग्र, भीम आणि ईशान I
ह्या तव नामाष्टकी वेदवचने महान I ओंकारासम प्रवर्तती II
ही तुझी सर्व नामे I वेदप्रतिपादित म्हणुन प्रेमे I
उच्चारीत नित्यनेमे I नमस्कारितो तुजला मी .......II२८II

हे निर्जनवनप्रिया, अतीसमीप अतीदूर I ऐशा तुला वारंवार I
नमस्कार माझा I नमस्कार माझा II
हे कामांतका, अतीलहान अतीमहान I ऐशा तुला असो नमन I
सदासर्वदा सदासर्वदा II
हे त्रिनयना, अतीवृद्ध अती तरुण I नमितो मी तवचरण I
पुन्हा पुन्हा I पुन्हा पुन्हा II
हे सर्वरुपी शिवशंकरा I सर्वाधिष्ठान भूत परात्परा I
परोक्ष वा अपरोक्ष परमेश्वरा I नमस्कारितो तुज सर्वदा .....II२९II

हे भवा, विश्वाचे उत्पत्तिकाळी I ब्रह्मदेवरुपे सृष्टी निर्मिली I
रौद्ररूप घेतले संहारकाळी I ऐशा हरा नमन माझे II
हे मृडा, लोकांच्या सुखसाधनकाळी I सत्वगुणे विष्णुरुपे जग सांभाळी I
त्रिगुणातीत रुपी तु चंद्रमौळी I मंगलशिवा तुज नमन माझे ......II३०II



श्लोक २५ ते २७

हे शंकरा, योगीजन करिती प्राणायाम I अष्टांगयोग साधूनी नियम I
विषयापासूने परावृत्त मन करूनी ठाम I ह्रदयकमळी स्थिरावती II
ऐसे करिता त्यांचे अंगावर I आनंदे रोमांच उठती फार I
हर्षे नेत्र वाहती झरझर I तत्व तेच तू परमेश्वर II
हेच तत्व पाहिल्यावर I आल्हाद दाटे अंत:करणी फार I
वाटे या अमृतडोही अपरंपार I डुंबत रहावे सर्वदा .....II२५II

देवा तूच अससी सूर्य I तूच चंद्र, तूच वायु, तोय I
तूच आकाश, अग्नि, पृथ्वी, निरामय I आत्माही तूच असशी बा II
ऐशा प्रकारे विद्वानजन I अष्टमूर्तस्वरूपे तव करिती वर्णन I
परि आम्हां या जगी तूजविण I कोणतेही तत्व आढळेना ....II२६II

हे शरणरक्षका, महेश्वरा I तीन वेद ह्रदयीच्या तीन अवस्थाकारा I
तीन भुवने, ब्रह्मा, विष्णु, महेश्वरा I ओंकाररुपी नटलासी II
ऐसे हे विकाररहित I सूक्ष्मध्वनींनी बोधित I
समस्तत्यस्त स्वरूपधारित I ऐशा ओंकारस्वरुपा नमन माझे .....II२७II


श्लोक २२ ते २४

हे जगनियमका, प्रजानाथ ब्रह्मदेव I निजकन्या संध्येचे पाहूनी लाघव I
मोहित होऊनी जातां जवळ I मृगरूप घेतले तियेने II
तोहि धरि मृगरूप I धावे तिचेमागे आपोआप I
परि जागृत असतां तू साक्षेप I कैसा अनर्थ घडावा II
तू पिनाकधनुष्ये सोडसी बाण I पिसाऱ्यासह शिरे मृगशरीरी पूर्ण I
भयभीत होऊनी ब्रह्मा जाण I स्वर्गी जाता जाहला II
तथापि तो शर अजून I जातो आहे मृगामागून I
दावि ऐशी सतत खूण I धाक राहण्या जनीमनी ......II२२II

हे योगनिष्ठा, स्वसौंदर्य भरवशाने I हाती धनु घेतले मदनाने I
जिंकावे तुला या मिषाने I परी त्व त्यालाचि भस्मिले II
हे पाहूनही त्रिपूरहरा I पार्वती मानिते स्त्रीसक्त तुजहरा I
तरी तरूण स्त्रिया भोळ्याच जरा I गमती नित्य जगी या ......II२३II

हे मदननाशका, स्मशाने तव नित्य वास I पिशाच्चे फिरती आसपास I
चिताभस्म लेपसी अंगास I नरमुंडमाला धरिसी तू II
अमंगळ असे हे आचरण I तथापि जे करिती तव नित्य स्मरण I
त्यांना तू भाससी परिपूर्ण I मंगलदायी वरप्रदा II२४II


श्लोक १९ ते २१

हे त्रिपुरहरा, विष्णू सहस्त्रकमले घेउन I बैसला तुझे करण्या पूजन I
वाहता एक कमळ पडलं उणं I स्वनेत्र तत्काळ अर्पिला II
देवा तूच घेतली परिक्षा I एक कमला केले अदृश्या I
पहाता उत्कट भक्ति विरुपाक्षा I संतुष्ट तू झालाशी II
त्या भक्तिचे फळ म्हणुनी I सुदर्शन चक्राचे रूप धरुनी I
विष्णूचे हाती नित्य राहूनी I करिसी रक्षण जगताचे .........II१९II

हे भगवन, वेदवचनी श्रद्धा ठेवून I जन निरनिराळे करिती यद्न्य I
फलप्राप्तीला तू जामीन I श्रौत, स्मार्त सर्व यद्न्यी II
यद्न्यकर्म जाता संपून I त्याचे फळ देण्या तू जागृत जाण I
विनाश पावल्या कर्मांचे फळ निदान I तूच जाणसी अंतरी .....II२०II

हे सर्व रक्षका, भक्तिश्रद्धापूर्वक I कर्म करिता होते फलदायक I
नसता भक्ति अंतरात I अनर्थ मात्र ओढवतो II
यद्न्यकर्मी निपुण दक्ष यजमान I त्रिकालद्न्य भृगु ऋत्विज जाण I
देव असता सदस्य पूर्ण I यद्न्य उध्वस्त जाहला II
यद्न्यफलदानाचेच ज्याला व्यसन I त्या तव हस्तेच होई यद्न्य भग्न I
भक्तिविरहीत कर्म हेच कारण I यद्न्यनाशाला झालेसे ......II२१II


श्लोक १६ ते १८

हे शंकरा तव तांडवनृत्य I परी पदाघाते भूमी संशयातीत I
प्रलयाचे चिंतेने भयभीत I होतसे तदाकाळी II
विष्णुपद, अंतरिक्ष झाले पीडित I फिरता गरगर तुझे हात I
जटांच्या ताडनाने स्वर्ग घाबरत I प्रभुत्व तुझे वेगळे II
तुझे ऐसे आचरण I त्यांत हेतु असे महान I
परी सामान्य जनां आकलन I होत नसे जाण पां .....II१६II

महेश्वरा, जो पसरे सर्व आकाशी I शोभे तारांगणी फेस विशेषी I
ऐसा गंगौघ मस्तकी धरिशी I जो बिंदुसमान भासतो II
परी या जलप्रवाहे I सारे जग द्वीप बनले पाहे I
जो समुद्रवलयांकित राहे I ऐसा महान जो II
तो त्वां मस्तकी धरिशी I गंगाधर नाम शोभे तुजशी I
ऐशा तव दिव्य भव्य रुपासी I कोणी कल्पू शकेना .......II१७II

हे महादेवा, त्रिपुरासुररुपी तृण I टाकण्यासाठी जाळून I
त्वां केला उपद्व्याप पाहून I स्तिमित होती सर्वही II
भूमीच्या रथावरी I ब्रह्मदेवा सारथी करी I
मेरुपर्वताचे धनुष्य घेऊनी करी I चंद्रसूर्य होती रथचक्रे II
चक्रधर विष्णूचा I योजिशी बाण साचा I
ईश्वरा, तुझ्या संकल्पईच्छा I स्वाधीन तुझ्या हे विश्व सारे ....II१८II


श्लोक १३ ते १५

हे वरदायका, बाणासूराने I तुझी सेवा केली प्रीतीने I
तुझ्या चरणी मस्तक भक्तिने I विनम्र केले सर्वदा II
त्याच भक्तिच्या जोरावर I राज्य केले त्रैलोक्यावर I
बनला इन्द्राहून थोर I आश्चर्य नसे यात काही........ II१३II

हे त्रिनयना समुद्रमंथनाचे वेळी I कालकूट विष ब्रह्मांड जाळी I
क्षय पाहूनी ब्रह्मांडाचा अवेळी I देव दानव घाबरले II
तेव्हां सर्व करिती प्रार्थना I देवा शंकरा धावा ना I
कालकूटापासूनी त्रिभुवना I वाचवा हो दयाळा II
तात्काळ होऊनी कृपावंत I विषप्राशन केले क्षणांत I
डाग पडला नीलवर्णी कंठात I शोभाच देई आपणां II
जग जेव्हा सापडे संकटी I तया संकटमुक्त करण्यासाठी I
झटता डागळे अंगकांति I प्रशंसनीय होय ती ......II१४II

हे इश्वरा, मदनाचे बाण I देव दानवांवरी विजय मिळवून I
कार्य आपुले साधल्यावाचून I परत कधीही न येती II
ऐसा तो मदन I तुलाही इतर देवांसम मानून I
सोडू पाहे तुझ्यावर बाण I आणि घडले अघटित II
तुझ्या केवळ दृष्टीक्षेपे I दग्ध जाहला साक्षेपे I
जितेंद्रियास पाहता सर्वानुरुपे I असेच होई सर्वथा .....II१५II


श्लोक १० ते १२

हे कैलासपते, अग्निसम तेज:पुंज I शरीर धारण करी तव महात्म्य सहज I
तव परिमाण ठरवू पाहती विष्णु पद्मज I थकले तेही शेवटी II
ब्रह्मदेव व भूरादि सप्तलोकी I विष्णु खाली पाताळादि सप्तलोकी I
महत्प्रयासे शोध करिती I परी परिमाण त्यां सापडेना II
तेव्हा भक्तिपूर्वक तव सेवा स्तुती I करीत राहिले दिवसराती I
त्या भक्तिसेवेची फलश्रुती I तव साक्षात्कार होय की II
देवा खरेच भावभक्तिने I तव सेवा करिता प्रीतीने I
इच्छिले फळ प्राप्त होणे I अशक्य नसे सर्वथा ......II१०II

हे त्रिपुरमंथना, रावणाला I देसि त्रिभुवनांचे राज्याला I
जेणे तव दृढभक्ति करुनी चरणकमला I निज नऊ मस्तके समर्पिली II
ऐसे निर्वैर राज्य मिळाले I परी रणकंडू न शमल्यामुळे I
वीस हात तैसेची राहिले I त्यांची रग न निमाली ......II११II

हे महिश्वरा तुझ्या कृपेने I सामर्थ्यशाली झालेल्या बाहूने I
कैलास ऊपटण्याचा रावणाने I उपद्व्याप चालविला II
तेव्हा तु पायाच्या अंगठ्याने I पर्वतास दाबिले टोकाने I
दडपून गेला रावण तेणे I पार पाताळी पोचला II
दुष्ट प्राणी होता संपन्न I होतो अविचारी बनतो कृतघ्न I
परी तव सामर्थ्यापुढे काय जाण I स्थिती होणार तयाची ....II१२II


श्लोक ७ ते ९

सर्ववेदविद्यासांख्यशास्त्र I शैवागम योगशास्त्र I
कोणी एक पढती वैष्णवशास्त्र I श्रेष्ठ हितकर जाणुनी II
जैसे आकाशातून भूमीवर I पडले पाणी गाठी सागर I
तैसे प्राप्त करण्या परमेश्वर I उपासती तुज देवा II
आपापल्या समजुतीने I रुचिवैचित्र्ये, नानामार्गाने I
उपासनांच्या योगाने I भजती तुला दयाळा ..........II७II

हे वरदा, तुझा कुटुंबसंसार I खट्वांग, परशु, नंदीकेश्वर I
गजचर्म, व्याघ्रचर्म परिकर I चिताभस्म लेपिसी II
सर्प सर्वांगा रुळती I नर कपाळ गळा शोभती I
स्मशानी सर्वदा वसती I आत्मानंदी विराजसी II
परी तुझ्या सेवेने वा कृपेने I देव इच्छिले मिळविती जाणे I
समृद्ध करिसी इतरांस झणे I स्वत: राहसी दरिद्री II
याचे सांगतो कारण I जो सच्चिदानंदपरमस्वरूपी रमण I
त्यासी रुपरसरंगादिकाचे आकर्षण I कधीच मोहू शकेना .....II८II

कोणी म्हणती जग हे शाश्वत I कोणी म्हणती अशाश्वत I
जगी या दोन्ही प्रकार आहेत I तिसरे म्हणती शाश्वत, अशाश्वत II
ऐसे भिन्न भिन्न बोलती विद्वान I त्यायोगे आश्चर्यचकित होऊन I
तरीही तव स्तुती महान I जाणतो मी अंतरी II
हे त्रिपुरहरा, तुझे स्तवन I करण्या मी न लाजे एक क्षण I
कारण वाचाळता असते धारिष्ट्यवान I विशेषत्वे भासते ......II९II


श्लोक ४ ते ६

हे देवा वरदायका I जगाच्या उत्पत्तीकारका I
पालनाकर्ता ,संहारकर्ता I तूच अससी बा रे II
तूच आपुल्या रूपांतून I सत्व,रज,तम गुण निर्मून I
ब्रह्मा, विष्णू, महेश्वर स्थापूनी I चारी वेदही निर्मिले II
ऐसे तुझे महात्म्य असतां I मूढमती तुज दोष लाविता I
अद्न्यानी , दुर्दैवी जी जनता I ह्या कोलाहले वेडावते II
परंतु जे द्न्यानी तव भक्तजन I तयांसी नावडे एक क्षण I
तयांसी तव भजन किर्तन I गोड वाटे सर्वदा ..........II४II

वृथा कोलाहल करूनी मूढमती I परमेश्वर नाही जगी म्हणती I
जरी आहे म्हणता तरी प्रचीती I सांगा म्हणती आम्हांसी II
देव करी विश्व निर्माण I तर मग कोणत्या रूपानं I
कशाप्रकारे, कशापासून I आधारे उपायी कोणत्या II
आपण जर सांगू जात I की मातीपासूनी घडतो घट I
तर म्हणती विशेष काय त्यांत I मानवही जे करू शके II
जर का सांगता येईना उत्तर I तर मग नसेच परमेश्वर I
असले कुतर्क करूनी वारंवार I मोडू बघती जगताला II
परंतु तू असशी कल्पनातीत I तू घटना घडविसी अघटीत I
तव महात्म्यापुढे खचित I फोल ठरती कुतर्क हे ...........II५II

पहा कैसे फोल ठरती I हे सर्व अवयवयुक्त लोक असती I
ते कैसे जन्म पावती I कर्त्यावाचून जगती या II
बरे तो कर्ता ईश्वरावाचून I जर का दुसरा असेल कोण I
तर मग हे जग निर्माण I कशापासून केलेसे II
जो नसे स्वशरीररचना जाणत I तोही चतुर्दशभुवने रचीत I
हे तो शक्य नसे खचित I अशक्यही सर्वथा II
तेव्हा हे देववरा I जगताची उत्पत्ती-लयकारा I
तुझ्यावाचून परमेश्वरा I कोणी नसे जगती या II
ऐसे असूनही देवाधिदेवा I ज्यांनी तुजविषयी संशय धरावा I
IIत्यांच्या औषध नाही स्वभावा I ते खरेच मूढमती ........II६II

श्लोक १ ते ३

II श्री II
II मराठी ओवीरूप महीम्नस्तोत्र II

श्री गणेशाय नम: I श्री पार्वती परमेश्वरायनम: II

देवा तुझे अनंत भक्त I त्यांतील महान पुष्पदंत I
त्याने स्तविले तुला संस्कॄतात I महीम्नस्तोत्र ख्यात जे II
गाईन म्हणते मी पण I मराठीत ते अनुवादुन I
परी अल्पमती मी तर जाण I तूच बुद्धी देईजे II
गंधर्व म्हणे हे शंकरा I हरण करिसी दु:खभारा I
यास्तव तुज हरा हरा I जय जय करिती सर्वदा II
तुझा अपार महिमा I न जाणता केले गायना I
तरी अयोग्य असे म्हणवेना I कारण अनभिद्न्य असे ब्रह्मही II
थोर थोर देव करिती स्तुती I परी कुंठित होई त्यांची मती I
तेही न जाणती तुझी महती I अपरंपार जी II
आपापल्या यथामतीने I केली तवस्तुती सर्वजने I
देवा, निर्दोष आहे हे स्तवणे I म्हणुन मीही स्तवू शके....... II१II

हे हरा , तुझा महिमा I वाणी मन यांसी अगम्या I
नेती नेती म्हणतची सुरम्या I स्तविती वेद बिचारे II
ऐशा देवा तुझी स्तुती I कोण करू शके जी जगती I
बहुविध गुणांनी तू नटसी I केवळ अवर्णनीय II
परंतु तू अनिर्वचनीय I निर्गुणरुपी असून I
भक्तानुग्रहास्तव सगुण रूप घेऊन I पार्वतीपरमेश्वर शोभसी II
वृषभवाहन जटाजूटधारी I त्रिशूळ डमरू शोभतो करी I
चंद्रकोर गंगा जटेवरी I व्याघ्रांबर वेष्टीलेसे II
ऐशा तर स्वरूपाकडे I पाहूनी मन, वाणी ज्याची न जडे I
ऐसा या त्रिभुवनी न सापडे I कोणी एक ............II२II

हे शिवा ब्रह्मरूपा I वाणी तव मधासम बापा I
अमृतासम वेदरूपा I प्रगटवसी उच्छ्वासे II
ऐशा तुझ्या वाणीपुढे I ब्रह्मा बृहस्पती गमती बापुडे I
तेथे म्या काय गावे पोवाडे I असाध्य आहे सर्वथा II
ऐसे असता त्रिपुरनाशका I तव गुणवर्णनी पुण्य जे कां I
त्या पुण्ये मम वाणी सर्वथा I पवित्र व्हावी वाटतसे II
याच एक इच्छेकरून I तुझी स्तोत्रे गाईन I
देई स्फूर्ती कृपा करून I देवा तूची शंकरा ...........II३II

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

विसरू नको रे आई बापाला

मराठा आणि ब्राह्मण वाद.....