shivaji महाराज.......

शहाजीराजे भोसले



पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्यांचे बीजारोपण शिवाजीराजांमध्ये करणारे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व!

जेव्हा दिल्लीमध्ये दिल्लीपती शहेनशाह शहाजान आणि महंमद आदिलशहा या दोघांनी मिळून निजामशाही संपवली, त्या वेळी निजामशहाचा वारसदार मूर्तझा या लहान मुलाला स्वत:च्या मांडीवर बसवून शहाजीराजांनी स्वतंत्रपणे राज्यकारभार सुरू केला, व जणू स्वत:वरच छत्र धारण केले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ ३ वर्षे टिकला होता. या प्रसंगातून छत्रपती शिवाजी महाराजांची तल्लख बुद्धी, पराक्रम, रयतेचे पालनपोषण करण्याची जबाबदारीची भावना, चारित्र्य याप्रमाणेच स्वराज्यसंकल्पना हे सर्व घटक आनुवंशिकतेने शहाजीराजांकडून त्यांच्या अंगी आले होते असे निश्र्चितपणे म्हणता येते.
फार वर्षांपूर्वी राजस्थानच्या चितोडगडच्या संग्रामात अल्लाउद्दीन खिलजीशी लढताना राणा लक्ष्मणसिंह नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला. पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ भोसाजी महान कार्य करून गेले. त्यांच्यामुळेच या वंशाला पुढे ‘भोसले’ हे नाव प्राप्त झाले. याच वंशात पुढे वेरुळस्थित बाबाजीराजे भोसल्यांच्या घरात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली. पुढे सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा १६०३ साली विवाह झाला. या वेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते. पुढे लगेचच मालोजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कालांतराने जसेजसे शहाजीराजे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली.
दरम्यान अहमदनगरजवळील भातवडीच्या रणांगणात निजामशाही संपवण्यासाठी भारतवर्षातील सर्व इतर सत्ता एकत्र आल्या होत्या. निजामशाही वाचवण्यासाठी या एकत्रित फौजांचा सामना शहाजीराजे वजीर मलिक अंबरच्या साथीने करीत होते (इ. स. १६२४). त्यांना त्यात यश मिळाले. शहाजीराजांचा ऐतिहासिक विजय झाला. याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले. पण पुढे मलिक अंबरची दरबारातील राजकारणी वागणूक पाहून शहाजीराजे आदिलशाहीत गेले. त्यानंतर १६३९ साली आदिलशहाकडून सरलष्कर ही पदवी त्यांना देण्यात आली व बंगळूरची जहागिरीही त्यांना प्राप्त झाली. आदिलशाहीत असताना शहाजीराजांनी पुणे परगणा निजामशाहीकडून काबीज केला होता.

शहाजीराजांना बंगळूरचा प्रदेश फार आवडला. शहाजीराजे व त्यांचे थोरले चिरंजीव संभाजीराजे यांनी आपल्या मनातील स्वराज्य संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे या ठिकाणी ठरविले. ते मुळातच उत्तम प्रशासक व पराक्रमी योद्धे होते. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणूनच त्यांनी योग्य वेळ पाहून पुण्यात आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी पाठवले होते. त्याचबरोबर श्यामराज रांझेकर, बाळकृष्णपंत हणमंते, रघुनाथ बल्लाळ अत्रे, कान्होजी जेधे नाईक व यांच्याबरोबर इतर अनेक मातब्बरांना जय्यत तयारीनिशी शिवाजी महाराजांसोबत राज्यकारभारासाठी पाठवले होते. राज्यकारभारासाठीची आवश्यक राजमुद्राही शहाजीराजांनीच शिवरायांना दिली.
दरम्यानच्या काळात आदिलशहाचा मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, मंबाजी पवार, बाळाजी हैबतराव, फतहखान, आझमखान यांच्या साहाय्याने शहाजीराजांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले. साखळदंडांनी बांधून भर विजापुरातून शहाजीराजांना दरबारात हजर करण्यात आले. तो दिवस होता २५ जुलै, १६४८ चा. हे कळताच शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीपणाने राजकारण करत दिल्लीत मोगल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठवले. स्वत: आपण व आपले पिता शहाजीराजे हे दिल्लीपतीची चाकरी करू इच्छितात असे त्यांनी लिहिले. या बदल्यात शहाजीराजांची विजापूरच्या कैदेतून मुक्तता करावी ही अट घातली. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी दिल्लीच्या बादशहाला मधाचे बोट लावले होते. हा प्रयत्न यशस्वी ठरला. शहाजीराजांची दि. १६ मे, १६४९ रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली.
शहाजीराजांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की त्यांनी स्वाभिमान राखत आदिलशाही, मुघलशाही व निजामशाही - या सर्व सत्ताधीशांकडे काम केले. त्यांच्या कारकीर्दीचे महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे,
इ. स. १६२५ ते १६२८ - आदिलशाही
इ. स. १६२८ ते १६२९ - निजामशाही
इ. स. १६३० ते १६३३ - मुघलशाही
इ.स. १६३३ ते १६३६ - निजामशाही
इ.स. १६३६ पासून पुढे - आदिलशाही

पुढे १६६१-६२ दरम्यान शहाजीराजे महाराष्ट्रात आले होते. त्यांनी त्यानंतरचा काही काळ शिवाजीराजे व जिजाबाईंसमवेत घालवला. आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले. काही काळानंतर ते पुन्हा आपल्या जहागिरीत परतले. माघ शुद्ध ५, म्हणजेच २३ जानेवारी,१६६४ रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा एका वृक्षवेलीमध्ये पाय अडकला व ते खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

 


राजमाता जिजाबाई



आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता!

कर्तृत्व मनगटात उतरण्यापूर्वी त्याला मनात रुजवावं लागतं. मडक्याचा आकार कुंभाराच्या हातांवर आणि त्याहीपेक्षा त्याच्या प्रतिभेवर, कल्पनाक्षमतेवर अवलंबून असतो. कर्तृत्ववान पुरुषांचही हेच सूत्र आहे. बालपणापासून ज्याला वाघ दिसला की झेप घेऊन त्याच्याशी त्याच्याच त्वेषानं लढावं ही शिकवण दिली जाते, तो आयुष्यात कशाचीही तमा करत नाही.
हिंदवी स्वराज्याच्या आड येणार्‍या भेकडांशी लढण्याचं धैर्य शहाजीपुत्र शिवरायांना मिळालं ते जिजाऊंच्या निडरपणे जगण्याच्या संस्कारांतून.
राजे सिंदखेड वतनाचे (सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील) पाच हजारी मनसबदार लखोजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. कर्तृत्ववान पित्याच्या पराक्रमाचे पोवाडे पाळण्यात असल्यापासून जिजाऊंच्या कानावर होते, पण वयासोबत पारतंत्र्याची जाणीवही वाढत गेली आणि लाचारीच्या व फितुरीच्या रोगाचा त्या मनापासून तिरस्कार करू लागल्या.
ज्या वयात बाहुल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुलं दंग असतात, त्या वयात जिजाऊ तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग होत्या. लष्करी प्रशिक्षणासाठी लखोजींकडे हट्ट करणार्‍या जिजाऊंना शूरवीरांच्या कथा ऐकून स्फुरण चढे. म्हाळसाईंनी आपल्या लेकीला अशा कथा सांगून तिच्या शूरपणाला प्रोत्साहन दिले.
लोकांनी गुलाम व्हावे, मुसलमानी साम्राज्याची इमाने इतबारे चाकरी करावी आणि मनसबदार, वतनदार व्हावे. ज्ञानी माणसांनी आपल्याच माणसांची घरे लुटून शत्रूने किती कमाई केली याचा हिशेब शत्रूलाच सांगावा. कलाकारांनी आपल्याच माणसांची फजिती रंगवून-रंगवून शत्रूला ऐकवावी.... सगळंच विपीरीत घडत होतं.
शत्रूचे सरदार आया-बायांची अब्रु वेशीवर टांगत होते. मुलींचा लिलाव होत होता. स्वातंत्र्य कशाला म्हणतात हे विसरून गेलेला समाज निमूटपणे सगळे अत्याचार सहन करत होता. शेतकर्‍यांची तर याहून वाईट अवस्था होती. पिकवावं आपण आणि कणगी मात्र बादशहाची भरावी. घाम गाळावा पण पोट भरू नये. समाजाची ही दयनीय अवस्था जिजाऊंना बघवत नव्हती. त्यांना या अन्याय-अत्याचार विरुद्ध लढणारा वीर पाहायचा होता.
जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसलेंशी झाला (१६०५). दोन तेजस्वी जीव एकत्र आले, पण तरीही जिजाऊंच्या स्वप्नातल्या हिंदवी साम्राज्याची पहाट दिसत नव्हती. अखेर त्यांनी भवानी मातेलाच साकडं घातलं. ‘तेजस्वी, पराक्रमी, स्वराज्य स्थापनेचे सामर्थ्य असणारा पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल’, म्हणून पदर पसरला. पराक्रमी शहाजीराजांची ओढाताण जिजाऊ जवळून अनुभवत होत्या. त्यांचे आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही इत्यादी शाहींमध्ये पराक्रम गाजवूनही असलेले दुय्यम स्थान जिजाऊंना जाणवत होते. ती सत्ता असली, तरी ‘तेथे’ मानसन्मान नाही, स्थिरता नाही, रयतेचं कल्याण नाही, याचे जिजाऊंना भान येत होते. मुलाच्या जन्माआधी त्याच्या जीवनाचं ध्येय ठरवणार्‍या किती माता या समाजात असतील देव जाणे, पण एका मातेने ती किमया केली आणि शतकानुशतके स्वराज्यावर अन्याय करणार्‍या दैत्यांचा नि:पात झाला.

भवानी आईला जिजाऊंचं हे मागणं पूर्ण करणं भाग होतं, कारण जे दु:ख जिजाऊचं होतं तेच दु:ख भवानी मातेचं होतं. तिचा धर्म बुडत होता. तिची मंदिरं पाडली जात होती, मूर्ती तोडल्या जात होत्या. तिलाही एक कर्तृत्ववान जीव जन्माला घालण्यासाठी समर्थ आई हवी होती. दोघींच्या गरजा एक होत्या. लक्ष्य एक होते. स्वप्न एक होते. या स्वप्नाचा परिपाक म्हणून जिजाऊंच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला आणि शिवजन्मासोबत हिंदवी स्वराज्याच्या पायाभरणीला सुरुवात झाली.
जिजाऊंनी शिवरायांना गोष्टी सांगीतल्या त्या पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या. सीतेचे हरण करणार्‍या दुष्ट रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता. अशा प्रत्येक गोष्टीत त्यांनी पराक्रमी पुरुषाला भगवंताचे स्थान दिले, तर स्वातंत्र्याला ध्येयाचे स्थान दिले.
‘प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते, जे पारतंत्र्यात असतात, त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे’, ही त्यांनी शिवरायांना दिलेली शिकवण होती. आणि त्यासोबत ‘आपण- समाज, तू आणि मीही - पारतंत्र्यात आहोत’, ही प्रत्येक कथेनंतर दिलेली जाणीव होती. कर्तृत्व गाजविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वराज्य स्थापन करणे ही शिवरायांची धारणा झाली, ती जिजाऊंच्या या संस्कारांमुळेच.

शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाऊंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार्‍याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचं धाडस दिलं. शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईनं लक्ष ठेवलं. शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाऊ राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत.
मुलं आईकडून सदाचार व प्रेमाचा, तर वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात, पण जिजाऊ त्याला अपवाद आहेत. शहाजीराजेंच्या गैरहजेरीत त्यांनी दोन्ही भूमिका पार पाडल्या.
या संस्कारांच्या जोरावरती छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची, प्रोत्साहनाची, मार्गदर्शनाची फुंकर घालत त्याला राजसिंहासनावर अधिष्ठित झालेला बघेपर्यंत जिजाऊ लढत राहिल्या. रायगडावर शिवराज्याभिषेक झाल्यानंतर बारा दिवसांनी १७ जून, १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला. रायगडाच्या पायथ्याशी पाचाड या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.


स्वामीनिष्ठ सेवक बाजीप्रभू देशपांडे

स्वराज्यासाठी अतुलनीय पराक्रम करून प्राणार्पण करणारे आणि हिंदवी स्वराज्याचा पाया रचणारे ‘शूर सरदार’!
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस येथील - मावळातील- सरदार म्हणजे बाजीप्रभू देशपांडे! हे मावळातील पिढीजात देशकुलकर्णी. शिवरायांविरुद्ध लढणार्‍या बांदलांचे बाजी दिवाण होते. बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही अमिषाला बळी न पडणारे असे होते. वयाच्या पन्नाशीतही दिवसातले २०-२२ तास काम करूनही न थकणार्‍या बाजींचा पूर्ण मावळ पट्ट्यात मोठा दबदबा होता. त्यांचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवरायांच्या चरणी वाहिली.

महाराजांपेक्षा वयाने मोठ्या असणार्‍या बाजीप्रभूंच्या मनात महाराजांविषयी आत्यंतिक प्रेमाबरोबरच भक्तिभाव होता आणि वडीलकीच्या नात्याने काळजीचीही भावना होती. पन्हाळगडाला शत्रूने वेढा घातलेला असताना छत्रपतींची त्यातून सुटका करणे; महाराजांना विशाळगडापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करणे - या भूमिका निभावताना बाजीप्रभूंनी आपले केवळ शौर्यच नव्हे तर प्राण पणाला लावले. ही घटना स्फुरण चढवणारी, स्वराज्याविषयीचा अभिमान (आजही) आपल्या रोमरोमात भिनवणारी आहे. बाजीप्रभूंनी ‘लाखांचा पोशिंदा’ सुरक्षित राहण्यासाठी आपला देह अर्पण केला. त्यांचा अतुलनीय असा पराक्रम महाराष्ट्रातील पुढच्या असंख्य पिढ्या नक्कीच स्मरणात ठेवतील.

सिद्धी जौहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजी विशाळगडाकडे निघाले होते. त्या वेळी आपली फसवणूक झाली हे लक्षात येऊन विजापूरी सैन्य त्यांचा पाठलाग करीत होते. पुढचा धोका लक्षात घेऊनच वडीलकीच्या अधिकाराने बाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते. सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली. पराक्रमाची शर्थ म्हणजे काय ते घोडखिंडीतील (पावनखिंडीतील) लढाईकडे पाहून समजते. (ही खिंड कोल्हापूर जिल्ह्यात आहे.)

सिद्धी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वत:चे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणार्‍या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले. (ही घटना दिनांक १३ जुलै, १६६० रोजी घडल्याची इतिहासात नोंद आहे.)

मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले. बाजी - फुलाजी बंधूंवर विशाळगडावर, महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बाजीप्रभू व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे. तसेच पन्हाळगडावर बाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे.

स्वराज्यनिर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप, सुरक्षित राहायला हवेत यासाठी स्वत: मृत्यूला सामोरे जायची तयारी असलेल्या बाजी आणि फुलाजी देशपांडेंसारख्या सरदारांमुळे स्वराज्याचा पाया रचला जात होता. परंतु ही हिर्‍यांसारखी अमूल्य माणसे सोडून गेलेली पाहताना महाराजांना काय वाटत असेल हे सांगणे कठीणच.
‘रणचंडीचे जणू पुजारी, पावनखिंडीचे गाजी।
विशालशैली दिसती दोघे, बाजी आणि फुलाजी।।’
(प्रख्यात दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांनी ‘बाजीप्रभू देशपांडे’ ह्या चित्रपटाच्या (१९२९) माध्यमातून बाजी प्रभूंच्या पराक्रमाच्या स्मृती जतन करून ठेवल्या आहेत.)

 


स्वामीनिष्ठ सेवक तानाजी मालुसरे

सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडोली गावचे तानाजी मालुसरे. छत्रपती शिवाजी राजांचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्र्वासातले. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत महाराजांबरोबर होते. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.

शत्रूवर आक्रमण करताना बेभान होऊन लढण्याची त्यांची वृत्ती होती. महाराजांनी कोकण स्वारीत संगमेश्वर काबीज करून तानाजी व पिलाजी ह्यांना तेथे ठेवले होते. सुर्व्यांनी अचानकपणे रात्री हल्ला केल्याने पिलाजी पळत होते. परंतु तानाजीने अतिशय शौर्याने सुर्व्यांचा हल्ला मोडून काढून मर्दानीपणा काय असतो ते दाखवून दिले. कोणत्याच गोष्टीसाठी हार मानणे त्यांना मान्य नव्हते.

स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणार्‍या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठे ह्या गावात येऊन ते राहिले. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्यांनी सहभागी करून घेतले. सिंहगडाच्या विजयामध्ये ह्या भागातील लोकांचाच सहभाग होता. कोंढाणा (सिंहगड) स्वराज्यात आणताना तानाजी मालुसरेंनी केलेला पराक्रम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.

स्वराज्यासाठी, आऊसाहेबांच्या(जिजाबाई) इच्छेखातर; जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा तानाजींनी उचलला होता. एवढे मोठे धाडस तानाजीसारखा निधड्या छातीचा माणूसच करू शकत होता. स्वराज्याच्या सेवेतील कामगिरीपुढे त्यांना आपल्या संसाराचेही भान नव्हते. कामगिरी आपल्या हातून निसटू नये म्हणून मुलाच्या लग्नाची वाच्यताही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर केली नाही. तानाजींचे शौर्य, पराक्रम, नेतृत्व हे शत्रूला आव्हान देणारे होते आणि शाहीरांच्या प्रतिभेलाही प्रेरणा देणारे होते. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानी मनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वत:चे प्राण तानाजींनी सोडले. ही घटना ४ फेब्रुवारी, १६७०रोजी घडली.

तानाजी मालुसरेंसह मावळ्यांच्या अवर्णनीय आणि विलक्षण अशा पराक्रमामुळे गड ताब्यात आला होता, पण.... सिंह गेल्याचे अतीव दु:ख छत्रपतींना झाले.
शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती,
......लढून मरावं ,मरून जगावं हेच आम्हाला ठाव .
ह्या गीताच्या ओळी सार्थ ठरवणारे सरदार (किंबहुना हे गीतच ज्यांच्या पराक्रमावर लिहिले गेले ते सरदार) म्हणजे तानाजी मालुसरे होत. अशा सिंहासारख्या शूरवीर, निष्ठावंत मराठी सरदाराची प्रतिमा प्रत्येक मराठी माणसाच्या मनात रुजली आहे.


स्वामीनिष्ठ सेवक नेताजी पालकर

नेताजी पालकर हे दीर्घ काळ स्वराज्याचे सरनौबत होते। त्यांना 'प्रतिशिवाजी' म्हणजेच 'दूसरा शिवाजी' असेही म्हटले जायचे. नेताजी मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरुर गावचे. त्यांनी अनेक युद्धे गाजवली होती. अफजलखान वधाच्या वेळी अफजल खानाच्या सैन्याला हुसकावून लावण्यात नेताजींनी सिंहाचा वाटा उचलला होता. पण पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराजांशी झालेल्या काही वादामुले त्यांना स्वराज्यापासून दूर जावे लागले होते तेव्हा त्यांनी मुघलांची चाकरी केली.पण पच्छाताप झाल्यामुले तब्बल नऊ वर्षांनी नेताजी पुन्हा स्वराज्यात आले.मुघलान्नी त्यांना आणि त्यांच्या भावाला जिवाची धमकी देऊन मुसलमान होण्यास प्रवृत्त केले होते. पण स्वराज्यात पुन्हा आल्यावर शिवाजी महाराजांनी पुन्हा योग्य विधि पर पाडून त्यांना हिन्दू धर्मात प्रवेश दिला होता.शिवाजी महाराजांनंतर त्यांनी संभाजी महाराजांची ही चाकरी केली होती.
पुरंदर तहानंतर शिवाजी महाराज, मिर्झा राजे, नेताजी पालकर आणि दिलेरखान विजापूरवर चालून गेले। तेथे आदिलशाही सेनापति सर्जाखान याच्यासमोर ते चौघे अपयशी ठरत होते. आणि त्या अपयशाचे खापर दिलेरखान महाराजांवरच फोडू लागला. म्हणून विजापूरकरांचा पन्हाळगड जिंकण्या साठी महाराज विजापुरहून परत आले, महाराजांनी रात्रीच गडावर छापा घातला. आदिलशाही किल्लेदार बेसावध असेल अशी महाराजांची खात्री होती पण किल्लेदार सावध होता. त्यात नेताजी पालकर वेळेवर पोहोचून महाराजांना कुमक पोहोचवू शकले नाहीत. यात महाराजांचा पराभव झाला आणि सुमारे १००० माणसे मारली गेली.महाराज नेताजींवर चिडले आणि त्यांनी नेताजीला पत्राद्वारे "समयास कैसा पावला नाहीस" असे म्हणून बडतर्फ केले.मग नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले. महाराज आग्र्याच्या भेटीस निघून गेल्यानंतर मिर्झाराजांनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मोगलांकडे वळवले.
शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यातुन औरंगजेबाच्या कैदेतून सूटण्यात यशस्वी झाले तेव्हा शिवाजी सुटला आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान दि।१९ ऑगस्ट १६६६ रोजी आग्रा येथून सोडले. नेताजी या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारुर येथे होते.दि.२४ ऑक्टोबर १६६६ रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी अन् त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली. ४ दिवसांच्या अतोनात हालानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली. दि.२७ मार्च १६६७ रोजी नेताजी मुसलमान झाले व त्यांचे 'महम्मद कुलिखान' असे नामकरण करण्यात आले.जून १६६७. औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना झाले.लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला. पुढे ९ वर्षे नेतोजी काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते.
शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते त्यावेळी औरंगजेबाला 'प्रतिशिवाजीची' आठवण झाली। बाटून ९ वर्षे उलटल्यावर नेताजी पक्का पाक झाला असे औरंगजेबाला वाटले. मग त्याने या 'मुहंम्मद कुलीखानास', दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले.मे १६७६. रोजी पच्छाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले.१९ जून १६७६ रोजी शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा विधीवत हिंदू धर्मामध्ये घेतले.
महाराज व नेताजी नातलग आहेत असे उल्लेख मोगली अखबारातून मिळतात। महाराजांची पत्नी पुतळाबाई राणी साहेब यांचे माहेर पालकर घराण्यातले आहे. महाराजांची एक राजकन्या कमलाबाई हिचे लग्न जानोजी पालकरांशी झाले. पण जानोजी अन् पुतळाबाई हे नेताजी नेमके कोण हे फार मोठे प्रश्णचिन्ह अजूनही आहे.'छावा' नुसार नेताजी पालकर शिवरायांच्या एक महाराणी सगुणाबाई यांचे सख्खे काका होते ।

 


स्वामीनिष्ठ सेवक -बाळाजी विश्वनाथ

महादजी विसाजी देशमुख हा बाळाजीचा पणजोबा व भट घराण्याचा ज्ञात पुरुष। त्यास नारो महादेव व परशुराम उर्फ शिवाजी अशी २ मुले. शिवाजीस ३ पुत्र कृष्णाजी, अंताजी व विश्वनाथ उर्फ विसाजी. विश्वनाथ हा बाळाजीचा पिता. बाळाजीला ४ भाऊ होते. कृष्णाजी, जानोजी, विठ्ठल व रुद्राजी. घराणं देशमुखीचं असल्याने बाळजीनानास मोडीवाचन, हिशेब, संध्या-रुद्रादी कर्मे यांच शिक्षण मिळालं. वयाच्या १०-१२व्या वर्षी बर्वे घराण्यातील ’राधाबाई’ हिच्या बरोबर त्यांचा विवाह झाला. इ.स. १६८९ च्या सुमारास म्हणाजे शंभूछत्रपतींच्या हत्येनंतर सिद्दीने उचल खाल्ली त्यामुळे त्याला श्रीवर्धन सोडावे लागले. त्यातच भट घराणे आंग्र्यांना सामिल आहेत या संशयाने सिद्दिने भट घराण्याचा छळ चालु केला. त्यांच्या "जानोजी" नावाच्या भावास सिद्दीने पोत्यात घालुन समुद्रात बुडवल्याची कथा आहे. त्याच किंवा तशाच कारणास्तव पिढीजात देशमुखी सोडून "बाळाजी भट" हे "भानु" कुटुंबा बरोबर सातार्यास आले. सिद्दीच्या हशमांनी पाठलाग सुरु केल्या वर मुरुड येथील "वैशंपायन" कुटुंबाकडे त्यांनी काही आठवडे आश्रय घेतला. पुढे याची आठवण ठेवुन एका "वैशंपायन" गुरुजींना त्यांनी आपले कुलोपाध्याय केले. शिवाय एक वैशंपायन १२०० स्वारांचे सरदार होऊन मध्यप्रदेशात ’सागर’ प्रांतात गेले असा उल्लेख मिळतो. बाळाजी बरोबर असलेल्या "भानु" कुटुंबात ३ भाउ होते. "हरी महादेव, बाळाजी महादेव आणि रामजी महादेव." त्या पैकी "बाळाजी महादेव" हा "नाना फडणवीस" याचा आजा. भट-फडणवी्स-वैशंपायनांचे संबध हे ३ पिढ्या जुने होते. पुढे १७१९ मध्ये दिल्लीस गेलेल्या सैनिकांची मुघलांशी लढाई झाली त्यात "बाळाजी महादेव भानु" कामी आले. म्हणजे पेशव्याच्या खुनाचा प्रयत्न होणार हे कळल्यावर बाळाजी विश्वनाथाचा जीव वाचवायला बाळाजी महादेव त्याच्या पालखित बसला आणि कटवाल्यांकडुन मारला गेला. स्वामीनिष्ठेची हि पराकाष्ठाच होती.
बाळाजी विश्वनाथ याने रामचंद्रपंत अमात्य यांच्याकडे कोठीवर कारकून म्हणून काम केले। त्यांची हुशारी धनाजी जाधव यांच्या नजरेस आली. धनाजीरावांनी आपले दिवाण म्हणुन आपल्या सेवेस घेतले. याचवेळी ते त्या भागाचे महसूल अधिकारी झाले. दिल्लीचा पातशहा "अबु मुझफ़्फ़र मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब आलमगीर गाझी" स्वत: अवघ्या सामर्थ्यासह महाराष्ट्रावर कोसळला होता. महाराष्ट्राचा छत्रपती त्याने हाल-हाल करुन मारला होता. अशाच अस्मानि-सुल्तानी संकटाला स्वराज्य पडेल ती किंमत देऊन तोंड देत होतं. संताजी-धनाजी, नेमाजी-खंडेराव हे गनिमी काव्याचे डाव टाकत मोठ्या मजला मारीत होते. बाळाजी विश्वनाथ फार जवळुन सगळ अनुभवत होता. १७०५ च्या दरम्यान त्याने देखिल आपली समशेर गाजवली आणि बहुतेक ती जस्तच परजली असावी कारण १६९९-१७०२ मध्ये बाळाजीला पुण्याची सुभेदारी मिळाली होती, आता त्याच बाळाजीला १७०५ च्या गुजरात स्वारीच्या दरम्यान दौलताबाद येथील सुभेदारी देखिल मिळाली. या सुभेदारीच्या काळातील बाळाजीची एक मुद्रा उपलब्ध आहे - "श्री उमाकान्त पदाभोजा भजनाप्रमुन्नते: बाळाजी विश्वनाथस्य मुद्रा विजयहेतराम।"
छ। राजारामांच्या अकाली निधनानंतर ’खेळणा’ उर्फ ’विशाळगडावर’ त्यांच्या ’शिवाजी’ या पुत्रास बसवले. ४ वर्षांचा मुलगा मराठ्यांचा छत्रपती झाला. पुढे ५-६ वर्षे मराठी सत्ता औरंग्याशी झुंजत होती. सातारा, परळी, सिंहगड, पन्हाळगड, विशाळगड असे किल्ले फितुरीने औरंगजेबाकडे आले. विशाळगडासाठी तर त्याने त्या काळी २ लाख रुपये मोजल्याचा पुरावा आहे. तर पन्हाळ्यासाठी त्याने ५० हजार रु. मोजले. १७०४ मध्ये त्याने राजगड व तोरणा घेतला. १७०२ मध्ये सिंहगडाच्या लढ्याच्यावेळी केवळ सामर्थ्य तोकडे पडले म्हणुन प्रदीर्घ लढ्यानंतर तडजोडीची बोलणी करायला मोगलांच्या छावणीत "बाळू पंडीत" म्हणजेच बाळाजी गेला होता. मात्र तत्पूर्वी किल्ला लढवत असताना "दारुगोळा कामी भासतोय, तरी त्वरा करा!" असे दारुगोळा पाठविण्या संबधीचे पत्र त्याने "अंबाजीपंत पुरंदरे" यांना लिहीलेले आढळते.
औरंगजेबाच्या मृत्युपश्चात शाहु महाराजांची सुटका झाली। या वेळी बाळाजीने शाहूंचा पक्ष घेतला. अर्थातच स्वराज्याच्या २ गाद्या तयार झाल्या. ताराराणींच्या पक्षातले अनेक जण बाळाजीने केवळ स्वत:च्या शब्दावर शाहू महाराजांच्या पक्षात आणले. राज्यकारभार चालवताना तुटलेली माणसे त्यांनी परत जोडली. जर शाहुंचा पाठिंबा लाभला तर आंग्रे सिद्दीशी सहज झुंजु शकतील हे आंग्र्यांना बाळाजीनेच पटवुन त्यांना शाहुंच्या पक्षात आणले. त्यांनी सय्यदबंधू बरोबर तह घडवुन आणला, मग त्यांच्याच सहाय्याने दिल्लीच्या फर्रुखसियर बादशहाला पदच्युत करुन रफिउद्दौरजात याला गादिवर बसवले. याच तहानुसार बाळाजींनी शाहुच्या पत्नींची सुटका करवुन घेतली. मात्र त्यावेळी २ गाद्यांमध्ये जीवघेणा संघर्ष उडु नये म्हणुन बाळजीने केलेली राजकारणे भल्याभयांच्या मतीला गुंग करणारी आहेत. आणि हे केवळ त्याने शब्द सामर्थ्यावर घडवुन आणले होते हे महत्वाचे. १७०७ पासुन पुढे १७२० पर्यंत म्हणजे मृत्युपर्यंत बाळाजीने छत्रपती शाहू महाराजांची एकनिष्ठपणे सेवा केली. छत्रपती शाहू महाराजांनीच बाळाजीला "पेशवेपद" दिले, अर्थात तो त्या योग्यतेचा होताच, आणि ते पद त्याने सहजगत्या पेलले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

विसरू नको रे आई बापाला

मराठा आणि ब्राह्मण वाद.....